![]()
पुणे रेल्वे स्थानकावर वरिष्ठ बुकिंग क्लार्कवर चाकूहल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवली पूर्व परिसरातून अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून चोरीची रोकड आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. ही घटना 18 ऑगस्ट रोजी रात्री एकच्या सुमारास घडली. फिर्यादी रेल्वे प्रशासनाच्या तिकीटविक्रीचे काम करत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचे मनगटी घड्याळ, दोन मोबाईल फोन आणि सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून तेथून पळ काढला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्तव्य बजावत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. पथकांनी पुणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकापर्यंतच्या मार्गावरील सुमारे 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित डोंबिवली पूर्व परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून जितेंद्र मोतीराम राठोड (24) आणि ईश्वर गोरख चव्हाण (23) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अजय मदन चव्हाण (35) याने गुन्हा करण्यासाठी आरोपींना मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीची रोकड आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.
Source link
पुणे रेल्वे क्लार्कवर चाकूहल्ला करून लूट:डोंबिवलीतून तिघांना अटक, सीसीटीव्हीने उघडकीस