![]()
पारनेर शहरातून जाणाऱ्या देवीभोयरे फाटा ते खडकी (नगर) रस्त्याच्या रुंदीकरणातील अडथळे दूर करण्यास सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) आपल्या विघ्नहर्ता रुग्णालयासमोरील रॅम्पचा अडथळा स्वतःहून दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे शहरातून जाणारा रस्ता २२ मीटर रुंदीचा करण्याच्या पारनेरकरांच्या मागणीला बळ मिळाले आहे. राजपथ बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विघ्नहर्ता रुग्णालयासमोरील रॅम्पचा अडथळा पोकलेन यंत्राच्या सहाय्याने दूर केला.यावेळी बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, अर्जून भालेकर,माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ,विजय औटी, बाळासाहेब पठारे, बाजार समितीचे संचालक शंकर नगरे,चंदन भळगट,मंगेश दाते,नगरसेवक योगेश मते,भूषण शेलार, डॉ .सादिक राजे, डॉ.विनायक सोबले उपस्थित होते.रुग्णालयासमोरील फलक उतरल्यानंतर संरक्षक भिंतीचा अडथळा दूर करण्यात येणार असल्याचे डॉ.कावरे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी (२४ ऑगस्ट) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत शहराच्या विकासासाठी रस्ता २२ मीटर रुंदीचा करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली होती.जागा उपलब्ध करून दिल्यास रस्त्याची रुंदी २२ मीटर ठेवण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुबोध वसईकर यांनी दिली होती.उपस्थितांनी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. २२ मीटर रस्त्यासाठी सीमांकन (हद्द निश्चिती) करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.या निर्णयानुसार,बैठक संपल्यानंतर लगेचच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांच्या उपस्थितीत राजपथ बांधकाम कंपनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सीमांकनाला सुरूवात केली. सीमांकनाचे काम संध्याकाळी क्रीडा संकुल परिसरात पूर्ण झाले. कृतीतून विकासाचा संदेश ^ शहराच्या विकासासाठी तसेच अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी,भविष्यात वाढणारी अपघातांची संख्या टाळण्यासाठी पारनेर शहरातून जाणारा रस्ता २२ मीटर रुंदीचा असावा अशी पारनेरकरांची आग्रही मागणी आहे.या मागणीसाठी आपणासह सर्व सहकारी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.या मागणीला बळ देण्यासाठी आपण अडथळा दूर करण्यासाठी सर्वात प्रथम पुढाकार घेतला.इतर व्यावसायिक,नागरिक निश्चितच सहकार्य करतील. डॉ.विद्या कावरे,नगराध्यक्षा -डॉ.बाळासाहेब कावरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल.
Source link
आधी आम्ही, मग तुम्ही; नगराध्यक्षांनी स्वतःच हटवला रस्त्याचा अडथळा:पारनेरच्या 22 मीटर रस्त्यासाठी विघ्नहर्ता रुग्णालयासमोरील रॅम्प हटवला