![]()
खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांनी जीवन संपवल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी मृत मुरलीधर आणि संगीता यांच्या आई-वडील व प्रत्येकी तीन बहिणींचे सविस्तर जबाब नोंदवले. मात्र, ‘आत्महत्येचे नेमके कारण त्या तिघांनाच माहिती’ असे सांगत दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली. दुसरीकडे, संगीता यांची लहान बहीण कल्याणी यांनी हा मृत्यू म्हणजे आत्महत्या नसून अपघात असल्याचा थेट दावा केला आहे. आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी त्याने डोंगरावर जाऊन भावनिक धमकी दिली असावी, मात्र तेथे समजवताना धक्का लागून तो अपघात झाला, असेही कल्याणी म्हणाल्या. मागील वर्षीचा प्रकार केवळ गैरसमज गेल्या वर्षी कुणालने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब कल्याणी यांनी फेटाळून लावली. कुणालला केवळ एकांत हवा होता, त्याने आईला तसा मेसेजही केला होता. मात्र, तो मेसेज न पाहिल्याने भीतीने संगीता यांनी थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले होते. रात्री 11 वाजता तो केवळ गैरसमज असल्याचे पोलिसांसमोर स्पष्ट झाले होते, असे कल्याणी यांनी सांगितले. पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांनी दरीत उडी घेऊन जीवन संपवल्याच्या घटनेत आता एक नवीन बाजू समोर आली आहे. मृत संगीता चांदगुडे यांनीच पती मुरलीधर यांना त्यांच्या आई-वडिलांपासून दूर केले, असा आरोप होत असताना संगीता यांची बहीण पल्लवी यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ‘दिव्य मराठी’ शी संवाद साधताना पल्लवी यांनी या कुटुंबाचा गेल्या 23 वर्षांचा संघर्ष, पहिल्या मुलाचा मृत्यू आणि जमिनीच्या वाटणीवरून झालेला खरा वाद उघड केला आहे. पुण्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या पल्लवी यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. गावाने पंचायत बसवून दिली होती शेतात जागा 23 वर्षांपूर्वी जेव्हा यांचे लग्न झाले तेव्हा संगीता शहरातील असल्याने ती खेड्यात राहू शकणार नाही या कारणावरून सासरच्यांचा लग्नाला विरोध होता. जेव्हा मोठा मुलगा आदित्य 14-15 महिन्यांचा होता तेव्हा हे दांपत्य गावी गेले असता घरच्यांनी त्यांना घरात घेतले नाही. त्या वेळी गावात पंचायत बसली आणि त्यांनी मुरलीधर यांच्या नावावर असलेल्या शेतात त्यांना राहायला जागा दिली. मुरलीधर ड्रायव्हर म्हणून काम करत असताना संगीता यांनी मुलांना पाठीला बांधून सलग 4 वर्षे एकटीने शेती केली, अशी माहिती पल्लवी यांनी दिली. ..म्हणून कुणालच्या मनात वडिलांबाबत असुरक्षितता गेल्या 10 वर्षांत मुरलीधर यांना कमरेचा गंभीर आजार झाला असतानाही त्यांच्या घरचे कोणीही त्यांना भेटायला आले नव्हते. 4 महिन्यांपूर्वी एका लग्नाच्या निमित्ताने मुरलीधर गावी गेले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या एका भाच्याने आत्महत्या केल्याने ते महिनाभर तिथेच थांबले. ज्या नातेवाइकांनी 20 वर्षे विचारपूस केली नाही त्यांच्याकडे वडील अचानक राहायला लागल्याने 18 वर्षांचा कुणाल दुरावला गेला आणि त्याच्या मनात वडिलांबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असावी, अशी शक्यता पल्लवी यांनी व्यक्त केली.
Source link
खवड्या डोंगर आत्महत्या प्रकरण:दोन्ही कुटुंबांचा तक्रारीस नकार; चांदगुडे कुटुंबाचे मृत्यूचे गुढ कायम, आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी कुणालची धमकी, मावशीचा दावा