Headlines

पुण्यात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन:उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले- शिवसेना सामान्यांच्या सेवेसाठी तत्पर




उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सामंत यांनी सांगितले की, शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सारसबागेजवळील शिवसेना भवनात हा कक्ष सुरू झाला. शिवसेनेचे राज्य निवडणूक समन्वयक वैभव वाघ यांच्या पुढाकाराने या कक्षाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे, सुधीर कुरूमकर, आबा बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सामंत यांनी शिवसैनिकांना आवाहन केले की, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. ही सहाय्यता कक्षाची चळवळ गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा उपक्रमांमुळे समाज घडतो आणि नेतृत्वही विकसित होते, असे ते म्हणाले. वैभव वाघ यांच्यासारख्या तरुणाच्या पुढाकारातून हा उपक्रम पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, शासनामार्फत विविध योजना आणि आरोग्य सुविधांसाठी निधी उपलब्ध असतो, परंतु माहितीअभावी त्या गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत. हा कक्ष अशा योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मदत करेल. अडचणीच्या काळात मदतीसाठी येणाऱ्या लोकांसाठी शिवसेना भवन हे दिघे साहेबांच्या आनंदाश्रमाप्रमाणे वाटावे, असे कार्य येथून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *