Headlines

अशोक खरातला जामीन मिळणार की तुरुंगातच राहणार?:आज नाशिक कोर्टात सुनावणी; उज्ज्वल निकम पहिल्यांदाच मांडणार सरकारची बाजू




भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणातील अनेक व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला अटक केली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो कारागृहात आहे. दरम्यान, अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय आज काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे. अशोक खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यापैकी 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणांचा तपास सुरू असून चौकशीतून आणखी काही माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. लैंगिक अत्याचारासह आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे हे प्रकरण गंभीर मानले जात आहे. उज्ज्वल निकम पहिल्यांदाच बाजू मांडणार सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम हे पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणात सरकारची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहेत. जून महिन्यात सरकारने त्यांची या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेकडून आतापर्यंत जमा करण्यात आलेले पुरावे, साक्षीदार आणि तपासाची सद्यस्थिती न्यायालयासमोर मांडली जाण्याची शक्यता आहे. अशोक खरातला जामीन मिळू नये, यासाठी सरकार पक्षाकडून जोरदार युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. यानंतर बचाव पक्षाकडून जामिनासाठी आपली बाजू मांडली जाईल. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे. तुरुंगातील वागणुकीचीही चर्चा अशोक खरात कारागृहात असताना त्याच्या वागणुकीबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. तो मंत्रजप करतो, काही वेळा स्वतःशीच पुटपुटतो आणि आपल्या कृत्यांना धार्मिक किंवा दैवी स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो, अशी माहिती समोर आली आहे. या वागणुकीमागे नेमके कारण काय आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, तपास यंत्रणांकडून त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. नाशिक पोलिसांसह SIT कडून प्रकरणाचा तपास पुढे नेला जात आहे. आजच्या सुनावणीकडे लक्ष अशोक खरातविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची संख्या, लैंगिक अत्याचाराचे आरोप आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकरण यामुळे आजची सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम पहिल्यांदाच सरकारची बाजू मांडणार असल्याने या सुनावणीकडे विशेष लक्ष लागले आहे. न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खरातच्या जामीन अर्जावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *