![]()
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या मृत्यूचे थेट कनेक्शन शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित पीएशी जोडले जात असल्याने राजकीय आणि वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या प्रसाद कोंडे देशमुख याच्याकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्याकडूनही आपल्याला सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी केली होती. याच त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हातावर लिहिली सुसाईड नोट डॉ. रूपनवर यांनी आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःच्या हातावरच सुसाईड नोट लिहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर, त्यांनी 29 ऑगस्ट रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्या आत्महत्येबाबत पूर्वसूचनाही दिली होती. ‘न्यायव्यवस्थेवरून उडाला विश्वास’ डॉ. रूपनवर यांचा एक व्हिडिओ आता समोर आला असून त्यात त्यांनी व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. ‘माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही, कारण डॉक्टर मदने यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही’, असे ते या व्हिडिओत म्हणत आहेत. तसेच, चौकशी समितीचा अहवाल आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवला जात असून तो वरिष्ठांकडे पाठवल्याचे कारण देत आपल्याला दाखवला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉ. भगवान पवारांवर गंभीर आरोप या संपूर्ण प्रकरणामागे डॉक्टर भगवान पवार हे असून त्यांचे पितळ उघडे पडेल म्हणून त्यांना वाचवले जात असल्याचा दावा डॉ. रूपनवर यांनी केला आहे. डॉ. पवार आणि आरोपी प्रसाद कोंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे समोर येऊ नये म्हणून ही लपवाछपवी सुरू असल्याचे ते म्हणाले. ‘जर मला न्याय मिळाला नाही, तर आधी सांगितल्याप्रमाणे 29 ऑगस्ट 2026 रोजी मी आत्महत्या करेल,’ असा इशारा त्यांनी दिला होता आणि अखेर त्यांनी आपले जीवन संपवले.
Source link
फलटणच्या डॉक्टरची मुंबईत आत्महत्या:तानाजी सावंतांच्या कथित PAकडून दबाव असल्याचा आरोप; हातावर सुसाईड नोट!