![]()
येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेतील आदर्श शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना ‘अचिव्हमेंट अवॉर्डस् २०२५-२६’ अंतर्गत आदर्श सेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक काकाजींच्या १३४ व्या जयंतीनिमित्त यंदापासून उपक्रमास सुरुवात झाली. मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या एकूण १७ शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना सन्मानित करण्यात आले. पुज्य काकाजींच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती कार्यालयाजवळील काकाजींच्या तसेच काकाजींना प्रतिकूल परिस्थितीत सहयोग दिलेल्या स्व. प्रागजीभाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. काकाजींच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळील स्वामी बँक्वेट हॉल येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. प्रास्ताविक संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य झुंबरलाल भंडारी यांनी केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे व आमदार सत्यजित तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून संस्थेच्या पुढील वाटचालीत संपूर्ण समर्पित भावाने सेवा देण्याची अपेक्षा व्यक्त केली. चांदवडचे नगराध्यक्ष वैभव बागूल व उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख अतिथींचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भास्कर भगरे, आमदार सत्यजित तांबे, आर्कि. रवींद्र बेलपाठक, नगराध्यक्ष वैभव बागूल आदी उपस्थित होते.
Source link
चांदवडमध्ये 17 शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना आदर्श सेवक पुरस्कार:श्री नेमिनाथ जैन संस्थेतील ‘अचिव्हमेंट अवॉर्डस 2025-26’ अंतर्गत गौरव