Headlines

खारवगळ नाल्यावर पुल बांधा:7 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण, घुईखेड परिसरातील शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा‎




प्रतिनिधी | चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील खारवगळ नाल्यावर तातडीने पक्का पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, चांदूर रेल्वे येथे निवेदन सादर केले. येत्या एका आठवड्यात पुलाच्या कामाबाबत ठोस निर्णय न झाल्यास ७ सप्टेंबरपासून खारवगळ नाल्याजवळ बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. घुईखेड येथील खारवगळ नाल्याच्या पलीकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीजमिनी आहेत. मात्र, पावसाळ्यात नाल्याला पूर आला की, शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागतो. संततधार पावसामुळे नाल्याची पाणीपातळी वाढल्यानंतर शेतकरी व शेतमजुरांचा शेतीकडे जाणारा मार्ग धोकादायक बनतो. अनेकदा अचानक पूर आल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात अडकून पडण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नाल्याच्या पाण्यामुळे परिसरातील शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. बेंबळा धरणामुळे पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. तसेच खारवगळ नाल्याचे पाणी चंद्रभागा नदीत सुरळीतपणे प्रवाहित न झाल्याने पाणीसाठा वाढतो, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाल्याचे खोलीकरण झाल्यानंतर गेल्या १५ ते १७ वर्षांपासून या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा राहत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. खारवगळ नाल्यावर पुलासाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत.०१७ मध्ये तत्कालीन खा. रामदास तडस यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून पुलाच्या निधीसंदर्भात पत्र दिले होते. मा,त्र त्यानंतरही निधी मंजूर झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी आ. प्रताप अडसड यांनीही पुलाचे काम प्राधान्याने करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. येत्या एका आठवड्यात पुलाच्या कामाबाबत ठोस निर्णय घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास ७ सप्टेंबरपासून खारवगळ नाल्याजवळ बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतांना उपसरपंच अनिल वानखडे, शेतकरी संजय गिरुळकर, शेख अंबीर शेख मुनीर, सुरेंद्र काकडे, आशीष बेंद्रे, राजू घुगरे, विजय मेश्राम, अशोक देशमुख, अमोल देशमुख, मनोहर उके, विजय मलोडे, लखपती मेश्राम, मारोती मेश्राम, अमोल बेंद्रे, प्रवीण धांदे, पांडुरंग भोयर, जनार्दन शेंडे, मनोज ढोके, विनय गोटेफोडे, मेहबूब खाँ पठाण, अनंत भोयर, हरिशाम कडू, ईश्वर भोयर, मधुकर शेंडे, सुरेश सहारे, अनिल सहारे, अतुल जवंजाळ, अमर बनकर, अरुण परसोडकर, संजय काकडे, बाबू काकडे, नीतेश बनकर, मोरेश्वर चनेकार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? वर्षानुवर्षे आश्वासनांची बरसात होत आहे. मात्र, प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाचा थेंबही शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला नाही. एखाद्या शेतकरी किंवा शेतमजुराचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *