Headlines

Amit Thackeray & MNS Workers Booked in Pune; Modi Photo Controversy


पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी स

.

अमित ठाकरे यांच्या महाविद्यालयाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे एका विद्यार्थ्याने अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला. काही वेळातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो भिंतीवरून खाली उतरवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली.

महाविद्यालयाच्या पाहणीसाठी गेले होते अमित ठाकरे

अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि महाविद्यालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध समस्यांची माहिती घेतली. महाविद्यालयाच्या कँटिनमधील जेवणाचा दर्जा, तसेच क्रीडा कोट्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरून अमित ठाकरे यांनी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना प्रश्न विचारले. पाहणीदरम्यान ते मुख्याध्यापकांच्या कार्यालयात असताना एका विद्यार्थ्याने कार्यालयातील छायाचित्रांकडे त्यांचे लक्ष वेधले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. त्यावर अमित ठाकरे यांनी, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो का लावण्यात आला आहे?, असा सवाल केला. यानंतर मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे यांनी मोदींचा फोटो तेथून खाली उतरवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला.

अमित ठाकरेंकडून फोटो हटवण्याच्या कृतीचे समर्थन

या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्याच्या कृतीचे समर्थन केले. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी यांना एवढ्या उंचीवर नेऊन ठेवू नका की त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होईल. शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा काही प्रोटोकॉल असेल, तर त्यानुसार फोटो लावण्यास आपली हरकत नाही. मात्र तो फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी लावण्याची गरज काय, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. “मोदींचा फोटो दुसरीकडे लावा; मात्र तो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नको,” अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजप नेत्यांनी या कृतीचा निषेध केला तर त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा, की छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना त्यांना मान्य आहे का, असा प्रतिप्रश्नही अमित ठाकरे यांनी केला.

शिवरायांचा अपमान सहन करणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे सांगताना अमित ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला. उद्या देवघरात नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला किंवा शिवाजी महाराज आणि मोदी यांचे फोटो शेजारी लावले, तर भाजप नेते त्याचे समर्थन करतील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यामुळे आधीच संवेदनशील असलेल्या या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे.

अमित ठाकरेंसह 20 ते 25 जणांवर गुन्हा

फोटो हटवल्याच्या घटनेनंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या 20 ते 25 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरा अटक केली. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्यावरही दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे मनसे आणि राज्य सरकारमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गजानन काळेंचा सरकारला सवाल

या कारवाईनंतर मनसेचे नेते गजानन काळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अमित ठाकरे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी पुण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. काळे यांनी म्हटले की, अमित ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी घेतलेला पवित्रा महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्ये आणि कृती करणाऱ्यांवर कारवाई होत नसताना मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“आज के शिवाजी नरेंद्र मोदी” पुस्तकाचा संदर्भ

गजानन काळे यांनी भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचा संदर्भ देत सरकारवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे हे पुस्तक प्रकाशित झाले होते. मात्र त्या प्रकरणात कारवाई झाली नसल्याचा दावा काळे यांनी केला. तसेच भंडारा येथे निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजपचा गमछा घातल्याचा उल्लेख करत, त्या प्रकरणातही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. “राष्ट्रपुरुषांच्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला होता. तो फोटो काढला म्हणून अमित ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होतो. हा राज्य सरकारचा कसला न्याय?” असा सवाल गजानन काळे यांनी केला.

पुण्यात राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता

एकीकडे अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो हटवण्याच्या कृतीचे समर्थन केले आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून दोन मनसे पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यामुळे पुण्यात भाजप आणि मनसे यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हा वाद केवळ फोटो हटवण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांची मांडणी, शासकीय संस्थांमधील छायाचित्र लावण्याचे नियम आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिमांबाबतचे निकष या मुद्द्यांवरही चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय होते आणि अमित ठाकरे यांच्याविरोधातील गुन्ह्याबाबत मनसे पुढे कोणती भूमिका घेते, याकडे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…

2 कोटी मतदार वगळले, मुंबईत 36 लाख; हा मोठा कट!:संजय राऊतांचा केंद्र व राज्य सरकारवर निशाणा; निवडणूक आयोग भाजपचा एजंट असल्याची टीका

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकार, निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादीत तब्बल दोन कोटी मतदार वगळल्याचा दावा करताना मुंबईतच 36 लाख मतदार कमी झाल्याचे राऊत यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर असून यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आर्थिक दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.