![]()
दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासाकडे लक्ष दे, असे आईने सांगितल्यानंतर नाराज झालेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापुरातील समाधाननगर परिसरात घडली. सोमवारी (31 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अक्षरा मारुती जाधव (वय 16, रा. समाधाननगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. अक्षरा यंदा दहावीच्या वर्गात शिकत होती. तिचे आई-वडील दोघेही वीटभट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही मुलीने शिक्षण घेऊन पुढे जावे, अशी त्यांची इच्छा होती. दहावीचे वर्ष असल्याने आईने तिला अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच ही घटना घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अक्षरा घरी असताना ही घटना घडली. काही वेळाने हा प्रकार कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिच्या भावाने दुपारी सुमारे 4.20 वाजता तिला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूने समाधाननगर आणि अक्कलकोट रोड परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. अभ्यासावरून आईने सुनावले होते अक्षरा दहावीत असल्याने तिच्या शिक्षणाकडे कुटुंबीयांचे विशेष लक्ष होते. सोमवारी आईने तिला ‘दहावीचे वर्ष आहे, अभ्यास कर’ असे सांगितले होते. त्यावरून ती नाराज झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. आईच्या बोलण्यामुळे आलेल्या रागातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनीही केवळ नातेवाईकांच्या माहितीनुसार कोणताही निष्कर्ष काढलेला नसून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे अभ्यासासाठी झालेल्या बोलण्याचा आणि घटनेचा थेट संबंध होता का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. वीटभट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह अक्षराचे आई-वडील दोघेही वीटभट्टीवर काम करतात. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. या परिस्थितीतही मुलीने शिक्षण घेऊन आयुष्यात पुढे जावे, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. दहावीचे वर्ष असल्याने तिच्या अभ्यासाला महत्त्व देण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न होता. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अक्षराच्या मृत्यूची बातमी समोर येताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. पोलिसांकडून तपास सुरू या घटनेप्रकरणी पोलिसांत अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेमागे नेमके कोणते कारण होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून माहिती घेतली जात असून, घटनेच्या पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे.
हेही वाचा.. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीपासून दूर:नाराजीच्या चर्चांना उधाण, दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय हालचालींना वेग महाराष्ट्राच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजेरीने महायुतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली; मात्र शिंदे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमागे नेमकं कारण काय, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. सविस्तर वाचा..
Source link
‘दहावीचे वर्ष आहे, अभ्यास कर’ आईचं म्हणणं जिव्हारी लागलं:16 वर्षीय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, सोलापुरात हळहळ