Headlines

'साखरेच्या दरात कृत्रिम वाढ':कारखानदार आणि व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट; राजू शेट्टी, महादेव जानकरांचा केंद्रावर हल्लाबोल!




देशभरात गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात अचानक झालेली प्रचंड दरवाढ आणि त्यानंतर गेल्या आठवड्यापासून अचानक कोसळलेले भाव या संशयास्पद खेळामुळे देशातील सामान्य ग्राहक होरपळून निघाला आहे. या संपूर्ण साखरेच्या खेळात ग्राहकांचे खिसे कापले गेले असताना, वाढीव दराचा एक रुपयाचाही फायदा देशातील कष्टकरी ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळालेला नाही. सरकारच्या या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळेच देशात मूठभर कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे फावले असून, त्यांनी बाजारपेठ वेठीस धरली असल्याचा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. या गंभीर प्रश्नावर दोन्ही नेत्यांनी दिल्लीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव (साखर ) अश्विन श्रीवास्तव यांची भेट घेऊन त्यांना फैलावर घेतले. केंद्र सरकारच्या नावाखाली देशात साखरेचा काळाबाजार आणि साठेबाजी सुरू असताना सरकार मूग गिळून का बसले आहे, असा संतप्त सवाल यावेळी नेत्यांनी उपस्थित केला. सरकारचे या साठेबाजांवर नियंत्रण का नाही? अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिवांशी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारच्या यंत्रणेवर अत्यंत कडक शब्दांत प्रहार केला. शेट्टी म्हणाले, “देशामध्ये पुढील नवीन हंगाम चालू होईपर्यंत सर्व जनतेला पुरेल एवढा साखरेचा साठा देशात शिल्लक आहे. असे असतानाही केवळ मूठभर बड्या साखर कारखानदारांनी आणि बड्या व्यापाऱ्यांनी संगनमत करून साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण केली आणि भाव गगनाला भिडवले. ही थेट साठेबाजी आणि लूट आहे. या वाढीव दराचा फायदा ना शेतकऱ्याला झाला, ना सामान्य ग्राहकाला. मग सरकारचे या साठेबाजांवर नियंत्रण का नाही? सरकार झोपले आहे का?” असा संतप्त सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे देशातील साखर साठ्याची जी आकडेवारी उपलब्ध आहे, ती संपूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी करण्यात आला. साखर कारखानदारांनी स्वतःचा काळाबाजार लपवण्यासाठी आणि साखरेचे भाव वाढवून ठेवण्यासाठी सरकारला साठ्याची चुकीची आकडेवारी दिली आहे. केंद्र सरकारने तात्काळ आपले ढिसाळ धोरण बाजूला ठेवून एका विशेष पथकाची नियुक्ती करावी आणि देशातील संशयास्पद साखर कारखान्यांच्या गोदामांवर थेट धाडी टाकून शिल्लक साखर साठ्याची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी आक्रमक मागणी महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी केली. ..शेतकरी देशोधडीला लागेल “पुढील हंगामात देशाला गरजेपेक्षा जास्त पुरेल एवढे साखरेचे बंपर उत्पादन होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत साखरेचा साठा पुरेसा आहे. केंद्र सरकारने साखरेचे भाव नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली कोणत्याही परिस्थितीमध्ये साखर आयात करण्याचा आत्मघातकी निर्णय घेऊ नये,” असा सज्जड दम राजू शेट्टी यांनी दिला आहे. जर सरकारने साखर आयात केली, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या साखरेचे भाव मातीमोल होतील आणि शेतकरी देशोधडीला लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तीव्र आंदोलन छेडले जाईल केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने या साठेबाजांना पाठीशी घालणे त्वरित थांबवून तातडीने कारवाई करावी, अन्यथा या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी दिला आहे. या भेटीनंतर आता केंद्र सरकार कारखानदारांच्या दबावाला बळी पडते की प्रत्यक्ष कारवाई करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *