Headlines

अमरावती बँकेच्या आमसभेत पीक नुकसान भरपाईचा ठराव:एकल महिलांना कर्ज, प्रोत्साहन निधी वाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार




अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) आमसभेत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये शेतीपिकांच्या नुकसान भरपाईची मागणी, एकल महिलांना कर्ज उपलब्ध करून देणे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन निधी वाढवण्याचा समावेश आहे. हे सर्व ठराव शासनाकडे पाठवून त्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे. आज, मंगळवारी अमरावती येथील सांस्कृतिक भवनात बँकेची आमसभा पार पडली. संचालक सुरेखाताई ठाकरे यांनी पीक नुकसान भरपाईच्या ठरावाची मांडणी केली, ज्याला सर्वांनी अनुमोदन दिले. एकल महिलांना कर्ज आणि प्रोत्साहन निधी वाढवण्यासंबंधीचे ठराव खुद्द अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनीच मांडले होते. या सभेत नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे काहीही झाले नाही. उलट, विरोधकांमधील काही संचालकही मंचावर उपस्थित होते, ज्यामुळे सभेचे वातावरण सौहार्दपूर्ण राहिले. सभेच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांनी प्रशासकीय माहिती दिली, तर बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी आढावा सादर केला. अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी बँकेच्या भविष्याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही बँक पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत बँकांपेक्षाही एक पाऊल पुढे असेल. बँकेच्या भागधारक असलेल्या सेवा सहकारी सोसायट्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एक संयुक्त भवन उभारले जाईल, तसेच महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने काही योजना सुरू केल्या जातील, असेही त्यांनी सूचित केले. मंचावर माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, सुनील वऱ्हाडे, रवींद्र गायगोले, हरिभाऊ मोहोड, चित्राताई डहाणे, जयप्रकाश पटेल, दयाराम काळे, आनंद काळे, अजय मेहकरे यांसह इतर संचालक उपस्थित होते. आजची आमसभा एडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटची होती. पुढील महिन्यात हा कार्यकाळ संपत असल्याने आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने तयारी सुरू केली असली तरी, सत्ताधारी आणि विरोधकांमधील काही कायदेशीर मुद्दे प्रलंबित असल्याने निवडणूक लांबण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *