.

रात्रीची वेळ… घरात अचानक बिबट्या शिरला… समोर आलेल्या या संकटात घाबरून आरडाओरड करण्याऐवजी शेतकरी सुभाष रघुनाथ भरसट यांनी प्रसंगावधान राखले. बिबट्या ज्या खोलीत गेला होता, त्या खोलीचे दरवाजे त्यांनी बाहेरून बंद केले आणि तातडीने वन विभागाला माहिती दिली. त्यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. पेठ तालुक्यातील हरणगाव शिवारातील कोकणहिल येथे मंगळवारी (दि. १) मध्यरात्री १२:३० वाजता हा थरारक प्रसंग घडला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केले. हरणगाव शिवारातील सुभाष रघुनाथ भरसट यांच्या मळ्यातील राहत्या घरात मध्यरात्री अचानक बिबट्याने प्रवेश केला. घरात बिबट्या आल्याचे लक्षात येताच भरसट यांनी न घाबरता त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. बिबट्या एका खोलीत गेल्याची संधी साधून त्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून सुरक्षितपणे बंद केला. त्यामुळे बिबट्या घरातच अडकला.
घराच्या आजूबाजूला बांधलेल्या कोंबड्या आणि शेळ्यांच्या वासाने बिबट्या शिकारीच्या शोधात आला. शिकार शोधत असताना तो थेट घराच्या पत्र्यावर चढला. मात्र, पत्रा जुना व कमकुवत असल्याने बिबट्याच्या वजनाने अचानक तुटला आणि बिबट्या थेट घरात खाली कोसळला. अचानक पडल्याने घाबरलेला बिबट्या घरातील एका खुर्चीच्या आड जाऊन लपला. दरम्यान, अचानक बिबट्या घरात पडल्याचे पाहून घरातील सदस्यांची भंबेरी उडाली. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी तातडीने घराबाहेर पळ काढला आणि बाहेरून दरवाजाची कडी लावून बिबट्याला आतच कोंडले. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
नागरिकांनी सतर्कता बाळगावी शेतात किंवा घराभोवती रात्रीच्या वेळी फिरताना हातात बॅटरी आणि काठी बाळगावी. घराबाहेर पुरेशा प्रकाशाची सोय करावी तसेच पाळीव प्राणी व लहान मुलांना सुरक्षित स्थळी ठेवावे. परिसरात बिबट्या दिसून आल्यास घाबरून न जाता किंवा त्याला चिथावणी न देता तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. नागरिकांनी खबरदारीच्या नियमांचे पालन करून वन विभागाला सहकार्य करावे. – सीमा मुसळे, वनपरिक्षेत्र अधिकारी.