![]()
महिलांचा सामाजिक, सार्वजनिक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासोबतच गावातील विविध प्रश्नांवर महिलांनी संघटितपणे पुढाकार घ्यावा, या उद्देशाने नांदुरा (ता.अमरावती) येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी गावशाखेच्या फलकाचे उद्घाटन, महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. गावशाखेच्या फलकाचे उद्घाटन नांदुरा सरपंच भाग्यश्री किरकटे यांच्या हस्ते झाले. व्ही.एम.व्ही. महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा बोरजार यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिलांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावतीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर आणि महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभा खापरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत महिला राजसत्ता आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे आणि गावशाखेच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देण्यात आली. महिलांनी ग्रामपंचायत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन गावाच्या विकासाशी संबंधित प्रश्न मांडावेत आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांची गरज यावरही प्रबोधन करण्यात आले. व्यसनाधीन व्यक्तींना केवळ दोष न देता त्यांना समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि सामाजिक सहकार्याच्या माध्यमातून व्यसनमुक्तीकडे नेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. व्यसनमुक्त व विवेकवादी समाजनिर्मितीत महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील महिला तसेच बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गावातील विविध प्रश्नांवर महिलांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन स्वाती कवाने यांनी केले, तर आभार किरकटे यांनी मानले. नांदुरा गावशाखेची कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष धनश्री किरकटे, उपाध्यक्ष दर्शना उगवकर, सचिव कांचन कचरे आणि कोषाध्यक्ष सोनू भडके यांची निवड करण्यात आली. नेतृत्वशील महिला म्हणून रेखा किरकटे, सुचिता वानखडे, कल्पना बुरघाटे, आशा भारसाकडे व मायावती बनसोड यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. गावशाखेच्या सदस्यांमध्ये नंदा मारबते, कविता शेंडे, अन्नपूर्णा रोहणे, प्रमिला केवट, सरूबाई, मंगला कचरे, वर्षा आडोळे, धनश्री किरकटे, कल्पना पेढेकर, सुषमा वानखडे, सीमा कचरे, चित्रा मोहोड, मंदा नागपुरे, मीना चांदुरकर, सुषमा सगणे, सलमा कौसर, नाहीद, तबस्सूम, शबनम सौदागर व पुष्पलता स्वर्गे यांचा समावेश करण्यात आला.
Source link
अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला नेतृत्वावर केले प्रबोधन:नांदुरा येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेचा शुभारंभ