Headlines

शेतात गांजाची झाडे; वडुले शिवारात तब्बल 170किलो सुका गांजा जप्त:नेवासे पोलिसांचा छापा; 40 ते 50 गांजाची झाडेही ताब्यात‎




प्रतिनिधी | नेवासे/ नेवासे फाटा वडूले (ता. नेवासे) शिवारातील शेतीमध्ये गांजाची झाडे लावून त्याची सुकवणूक केल्यानंतर छुप्या मार्गाने तालुक्यात विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती नेवासे पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (३१ ऑगस्ट) शेतात छापा टाकून सुमारे ४० ते ५० जिवंत गांजाची झाडे आणि तब्बल १७० किलो वाळवलेला गांजा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह वडूले शिवारात सापळा रचला. शेतमालक बबन शंकर देशमुख (वय ६०) यांच्या मालकीच्या शेतीमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी शेतात गांजाची जिवंत झाडे तसेच सुकवून ठेवलेला गांजा आढळून आला. पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या ‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अमली पदार्थांविरोधात प्रभावी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हवालदार बंटी काळोखे, वाघमोडे, शेळके, गाजरे, बर्डे, अप्पा वैद्य, गवळी, वाघ, नारायण डमाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल गीता पवार, सुमित करंजकर, खंडागळे यांच्यासह होमगार्ड सहभागी झाले होते. ड्रग्स किंवा अमली पदार्थांच्या अवैध विक्रीबाबत कोणतीही गोपनीय माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तातडीने डायल ११२ किंवा नेवासे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले. गांजाच्या नशेमुळे मेंदू, हृदयावर परिणाम गांजाच्या नशेमुळे मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांवर विपरित परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती, एकाग्रता व निर्णयक्षमता कमी होणे, चिंता, घबराट, संशय किंवा भ्रम निर्माण होणे शक्य आहे. धूम्रपानामुळे खोकला व श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. वाहन चालवताना गांजामुळे प्रतिक्रिया वेळ कमी होऊन अपघाताचा धोका वाढतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *