Headlines

पेपरफुटीचा ‘खेळ’ थांबवा; विद्यार्थ्यांना न्याय द्या- राष्ट्रवादी:औषध निरीक्षक परीक्षा गैरप्रकार,चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी‎




महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट-ब परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पेपरफुटीचा ‘खेळ’ थांबवून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सीताराम काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला धक्का बसला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण व निराशेचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी कष्टाने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, पैशाच्या बळावर गैरप्रकार करून संधी मिळत असल्यास प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची भूमिका पक्षाने मांडली. कथित पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करून त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी. चौकशीत दोष सिद्ध झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई करावी तसेच गैरप्रकारातून झालेल्या संबंधित निवडी रद्द कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, शहर महिला अध्यक्ष अर्चना गायकवाड, नगर तालुका अध्यक्ष शरद पवार, शहर कार्याध्यक्ष नामदेव पवार, अनिकेत कराळे, समीर पठाण, रामभाऊ झिने, रामदास ससे, अझर शेख, फारूक रंगरेज, महेश पवार यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *