![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावर मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देताना जरांगे यांच्या भाषेबाबत नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आमच्यावर आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची सून परत करणारी अवलाद आमची आहे. भाषा चुकीची वापरली गेली असेल तर ती भाषा चुकीचीच आहे.” विनोद पाटील म्हणाले, “महिला दंडाधिकारी असो किंवा कोणीही महिला असो, चुकीचं वक्तव्य करणे योग्य नाही. परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे, गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपाशी आहेत, त्यामुळे थोडी चिडचिड साहजिक आहे. तरीही मी मनोज जरांगे यांना आवाहन करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर उपोषण करत आहोत. त्यामुळे आपण जबाबदारीने भाष्य केले पाहिजे. आता मराठा समाजाबद्दल इतर वावड्या उठवल्या जात आहेत, भाषेचा उल्लेख करून विषयांतर केले जात आहे. त्यामुळे भाऊ म्हणून मित्र म्हणून मी भाषा चांगली वापरण्याची विनंती करतो. पुढे बोलताना विनोद पाटील म्हणाले, महिला जिल्हाधिकारी यांना मी सांगू इच्छितो की त्यांचा आमचा वाद नाही, मनापासून सांगतो. महिलांचा सन्मान आणि संरक्षण ही माझ्यासह सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये. कुठल्याच अधिकाऱ्यांच्या विरोधात मराठा समाज नाही. जिल्हाधिकारी महिला यांच्या विरोधात कुठलीही भाषा वापरली गेली नाही. मंचावर असताना काही शब्दांचा प्रयोग झाला मात्र तो त्यांच्यासाठी नव्हता. मनोज जरांगे यांना विनंती करतो की आपण चांगल्याच भाषेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना सातत्याने टार्गेट केले जात असल्याच्या चर्चेवर विनोद पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांचे आणि मराठा समाजाचे अतूट नाते असल्याने आम्ही त्यांना कधीही टार्गेट करू शकणार नाही,” असे विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.
Source link
जरांगे पाटलांच्या भाषेवर विनोद पाटलांची उघड नाराजी:म्हणाले- भाषा चुकीची असेल तर ती चुकीचीच, महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे