![]()
लासलगाव व परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव बस आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते विधिवत लोकार्पण करण्यात आले. लासलगाव हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी व कृषी केंद्र असून परिसरातील अनेक गावांमधील नागरिक, विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार तसेच नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर एसटी बससेवेचा वापर करतात. प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन लासलगाव बस आगाराचा ताफा अधिक सक्षम करण्यासाठी या नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाच नवीन बसेसमुळे लासलगावसह परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, विविध मार्गांवरील बससेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आमदार पंकज भुजबळ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. गावागावातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, बाजारपेठ आणि विविध शासकीय सेवांशी जोडण्यासाठी एसटीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे लासलगावसह येवला – लासलगाव मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगली वाहतूक सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले.
यावेळी येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, लासलगाव आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, मंगेश गवळी, भाऊसाहेब बोचरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लासलगाव बस आगाराचे चालक, वाहक व कर्मचारी उपस्थित होते.
Source link
लासलगाव आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल:आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवास होणार आरामदायी