![]()
ग्रामीण भागातील जुन्या चालीरीती व परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपल्या जात असल्याचे चित्र कजगावात पाहायला मिळाले. येथील भाईकनशा फकीर बाबांनी तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी सुरू केलेली “कुवारी पंगती’ची अनोखी परंपरा ग्रामस्थांनी यंदाही मोठ्या भक्तिभावाने साजरी केली. श्रावण महिन्यातील गुरुवारच्या मुहूर्तावर आयोजित या पंगतीत शेकडो शाळकरी मुलांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. गावात दमदार पाऊस होवो अथवा पावसाने दडी मारलेली असो, ही वार्षिक परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली जाते. या परंपरेनुसार, सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन भाईकनशा फकीर बाबांच्या समाधीस्थळी (दर्गा) चादर व फुले अर्पण करून मंत्रपठणासह धार्मिक विधी पार पाडतात. त्यानंतर बाबांच्या वास्तव्य स्थळाचे पूजन करून प्रथम ११ लहान मुलांना विधिवत गोड भात दिला जातो. यानंतर गावातील सर्व शाळांमधील शेकडो लहान मुलांसाठी गोड भाताच्या कुवारी पंगतीचे आयोजन केले जाते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, माजी सरपंच दिनेश सुमेरसिंग पाटील उपस्थित होते. ज्या भाईकनशा फकीर बाबांनी ही प्रथा सुरू केली, त्यांनी वृद्धापकाळात तितूर नदीकाठच्या घनदाट अरण्यात जिवंत समाधी घेतली होती. हे समाधीस्थळ आज सर्वधर्मसमभावाचे केंद्र बनले आहे. दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येथे भरणाऱ्या उरुसात कुस्त्यांची दंगल, तमाशा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवतात. यावेळी स्वप्निल भरतसिंग पाटील, माजी उपसरपंच हाजी शफी मणियार, विजय गायकवाड, एकनाथ देवसिंग पाटील, राजेंद्र रामसिंग पाटील, अरुण पाटील उपस्थित होते.
Source link
250 वर्षांची ‘कुवारी पंगत’ परंपरा कायम:भाईकनशा फकीर बाबांच्या समाधिस्थळी धार्मिक विधी उत्साहात