![]()
काही दिवसांपूर्वी गणपतीची मूर्ती आणताना मुंबईतील लालबाग, परळ आणि माझगाव परिसरात आगमन मिरवणुकांवर अंडी फेकणे व भाविकांशी गैरवर्तन करण्याच्या घटनांचे तीव्र राजकीय पडसाद आगामी नवरात्रोत्सवावर उमटू लागले आहेत. या घटनांचा दाखला देत बोरिवली पश्चिमेतील कोरा केंद्र मैदान क्र. ४ येथे आयोजित ‘शोग्लिट्झ नवरात्र २०२६’ महोत्सवात भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी गरब्यामध्ये मुस्लिमांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा देत भाजपने घेतलेल्या या भूमिकेमुळे उपनगरातील सण-उत्सवांच्या मैदानातून पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ‘लव्ह जिहाद खपवून घेणार नाही आमदार संजय उपाध्याय: आमदार संजय उपाध्याय म्हणाले, “नवरात्र हा आमच्या भगिनींच्या सुरक्षेचा आणि आदिशक्तीच्या आराधनेचा उत्सव आहे. नाव आणि वेश बदलून गरब्यात शिरकाव करणे आणि हिंदू मुलींना फसवून ‘लव्ह जिहाद’ करण्याचे प्रकार आता सहन केले जाणार नाहीत. गणेशोत्सवातील उद्दामपणाला माँ दुर्गेच्या भाषेत जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यामुळे आमच्या आयोजनात केवळ हिंदू कुटुंबीयांचेच स्वागत असेल, मुस्लिमांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच शनिवार व रविवारसाठी राज्य सरकारने रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची सवलत द्यावी, असेही ते म्हणाले. १.२५ लाख चौरस फुटांचे मैदान असेल ‘शोग्लिट्झ’चे संचालक संतोष सिंह यांनी स्पष्ट केले की, १.२५ लाख चौरस फुटांचे लाकडी फ्लोअरिंग, ४०० बाउन्सर्स, १०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि १ हजार वाहनांच्या पार्किंगसह दररोज २० हजारांहून अधिक भाविकांच्या सुरक्षिततेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या मैदानावर पिण्याच्या पाण्याच्या सोयीसह इतर सुविधा देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे नेहमीच अडथळे : गोपाळ शेट्टी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले, “काँग्रेसने सत्तेत असताना नेहमीच हिंदूंच्या धार्मिक आयोजनांमध्ये अडथळे आणले. संस्कृतीशी छेडछाड केल्यामुळेच आज काँग्रेसची ही दुरवस्था झाली आहे. भविष्यात ध्वनिप्रदूषण आणि वेळेच्या नियमांची अडचण येऊ नये म्हणून उत्तर मुंबईत ‘नेस्को’च्या धर्तीवर भव्य बंदिस्त इनडोअर डोम उभारण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावेल.” संस्कृतीसोबत यंदा मराठी गाणी वाजणार लोकगायिका गीता बेन रबारी म्हणाल्या, “मुंबई हे सर्वसमावेशक शहर असून येथे प्रत्येक भाषेचा सन्मान राखणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे गुजराती लोकगीतांसोबतच यंदाच्या नवरात्रात मी मराठी गाणीही सादर करणार आहे. आजची तरुण पिढी (जेन-झी ) आधुनिक संगीत ऐकत असली, तरी ती भारतीय संस्कृती, परंपरा आणि भक्तीशी घट्ट जोडलेली आहे. संगीतात प्रयोग झाले तरी या उत्सवाचा मूळ गाभा देवीची भक्ती हाच राहील.”
Source link
वाद पेटला:गणपती मूर्तीवर अंडी फेकल्यामुळे गरब्यामध्ये मुस्लिमांना ‘नो एन्ट्री’, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला भाजपने दिला पाठिंबा