![]()
रिद्धपूर येथील मौजा नजरपूर परिसरात शनिवारी (दि. ५) सकाळी एका पट्टेदार वाघिणीने शेतात बांधलेल्या गायीवर हल्ला करून तिला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजता एक शिक्षक तारोडा येथील शाळेकडे जात होते. रिद्धपूरपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर मोर्शी वनपरिक्षेत्रातील मोनापूर वनक्षेत्राजवळ त्यांना रस्ता ओलांडताना एका पट्टेदार वाघिणीचे दर्शन झाले. त्यांनी तत्काळ ही माहिती परिसरातील शेतकऱ्यांना दिली. वाघ दिसल्याची बातमी समजताच शेतकऱ्यांनी शेतातून गावाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. वन विभागाच्या पथकाने परिसराची पाहणी केली. वाघिणीच्या पाऊलखुणांची तपासणी केली. एका शेतातील शेततळ्याजवळही वाघिणीच्या पाऊलखुणा आढळून आल्या. दरम्यान, एका शेतकऱ्याने आपल्या शेताच्या मागील भागातून पाळीव जनावराच्या ओरडण्याचा भयभीत आवाज ऐकू आल्याचे वन कर्मचाऱ्यांना सांगितले. यावरून शेतकरी मोहन निभोरकर यांनी आपल्या शेतात चार जनावरे बांधून ठेवल्याची माहिती दिली. वन विभागाच्या बचाव पथकाने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने संबंधित परिसराची पाहणी केली. चार बांधलेल्या जनावरांपैकी एका गायीवर हल्ला करून तिला ठार केल्याचे निदर्शनास आले. पथकाने उर्वरित तीन जनावरांची सुखरूप सुटका केली. ती शेतकऱ्याच्या ताब्यात दिली. ठार झालेल्या गायीबाबत नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले. हा हल्ला वाघिणीनेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी भांबोरा येथील शेतकऱ्याचा आणि एका गायीचा बळी घेणारी हीच वाघिण असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. पायाच्या ठशांवरून ते वाघिणीचेच रिद्धपूर परिसरात आढळलेले पायाचे ठसे वाघिणीचेच असावेत, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागातील गायीची शिकारसुद्धा वाघिणीनेच केली असावी. या वाघिणीला पकडण्यासाठी २४ तास आमचे पथक तैनात आहे. कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत. – मयूर भैलुमे, एसीएफ
Source link
पाऊलखुणा:रिद्धपुरात वाघिणीचा धुमाकूळ; नागरिक भीतीच्या सावटाखाली, वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल