![]()
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रद्द करा व जुनी पेन्शन लागू करा, या दोन प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी ५ सप्टेबर या शिक्षकदिनी शिक्षकांनी काळी फित लावून काम केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने या आंदोलनाची हाक दिली होती.
.
शाळेत अध्यापन व शिक्षक दिनाचे कार्यक्रम सुरु असतानाच हे आंदोलन केले गेले. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांकडे सरकारकडून नेहमी दुर्लक्ष केले जाते, असा या संघटनेचा आरोप आहे. या धोरणाच्या निषेधार्थ आज जिल्हाभरातील शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. सन २०१० पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून पूर्ण सूट द्या, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा, टीईटीमुळे प्रभावित सेवांतर्गत शिक्षकांना कायदेशीर व धोरणात्मक संरक्षण द्या, आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी योग्य दिलासा द्या, अशा घोषणाही काही ठिकाणी देण्यात आल्या. शिक्षक दिनासारख्या पवित्र दिवशी उत्सव साजरा करण्याऐवजी शिक्षकांना काळ्या फिती लावून निषेध नोंदवावा लागणे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यामुळेच शासनाने शिक्षकांच्या लोकशाही मार्गाने नोंदविलेल्या निषेधाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यात राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील, जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस सुभाष सहारे, कार्याध्यक्ष संजय साखरे, कोषाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेसह सर्व तालुका अध्यक्ष सरचिटणीस व सर्वसामान्य शिक्षकांनी काळ्या फिती लावून या आंदोलनात सहभाग घेतला. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची सेवांतर्गत शिक्षकांवरील सक्ती रद्द करणे आणि जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पूर्ववत लागू करणे, या प्रमुख मागण्यांसाठी हे निषेध आंदोलन करण्यात आले. शासनाने याची दखल न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
मुख्यमंत्री, आयुक्तांना मागण्यांसाठी घातले साकडे