![]()
महानगरपालिका आणि द आयकॉन पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीला आकार देत श्री गणेशाच्या विविध रूपातील सुंदर मूर्ती साकारल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेल्या गणेशमूर्तीची आपल्या घरी स्थापना करण्याचा संकल्प केला. यावेळी महापौर ज्योती गाडे, आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, नगरसेविका पौर्णिमा गव्हाळे, सुजय मोहिते, कर्नल आर. सी. राणा, आराधना राणा, अमित मुथा, सुरेश खामकर, प्राचार्य दीपिका नगरवाला उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, गणेशोत्सव हा आपल्या सर्वांचा आवडता उत्सव आहे. पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याचे काम शाडू मातीच्या गणपती बनविण्याच्या कार्यशाळेतून होणार आहे. विद्यार्थ्यांनी नवीन गणपतीची मूर्ती विकत न घेता आपल्या हाताने शाडू मातीला आकार देऊन तयार केलेल्या गणेशमूर्तीची पारंपरिक पद्धतीने घरी स्थापना करावी. स्वच्छ, सुंदर आणि हरित अहिल्यानगर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली असून यामध्ये पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याबरोबरच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम आणि हानी याची माहिती विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मिळणार आहे. शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक फायदे असल्याचेही महापौर ज्योती गाडे यांनी सांगितले. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, नगर शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, जेणेकरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पर्याय उपलब्ध होईल आणि त्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळता येईल असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाची प्रत्येकाची जबाबदारी : डांगे गणपतीची मूर्ती तयार करणे हे केवळ एक जबाबदारीचे काम नसून पर्यावरण संवर्धनाचा एक मार्ग आहे. पर्यावरणावर काम करणे ही केवळ महापालिकेची एकट्याची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे यावर्षी प्रत्येकाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
Source link
शहरामध्ये तब्बल 500 विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती:शहरातील महापालिकेत शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा