![]()
चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे आपल्या शेतात कपाशी पिकाला युरिया खत टाकत असलेल्या एका शेतकऱ्यावर नरभक्षक वाघिणीने अचानक हल्ला करून त्यांचा बळी घेतला. घटनेनंतर ही वाघीण त्याच ठिकाणी शेतकऱ्याचा मृतदेह खात बसली होती. दरम्यान, गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहणी केली असता, वाघीण मृतदेहाजवळच बसलेली दिसून आली. यानंतर वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाघिणीला ट्रँक्यूलाईज (बेशुद्ध) केले. या कारवाईमुळे गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेला या नरभक्षक वाघिणीचा तांडव अखेर थांबला असून तिला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान वनविभागाने ताब्यात घेतलेल्या वाघिणीची प्रकृती गंभीर झाली असून तीला मार्गातच ऑक्सिजन लावावे लागले आहे. शिरसगाव कसबा येथील शेतकरी दिनेश आवारे यांचे कालाटोला मौजेमध्ये अडीच एकर शेत आहे. सोमवारी सकाळी ते याच शेतात गेले होते. त्यांनी शेतात कपाशीची पेरणी केली आहे. कपाशीला खत टाकत असताना वाघिणीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, सकाळी शेतात गेलेले दिनेश दुपारी उशिरापर्यंत परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना फोन लावले; मात्र त्यांनी फोन उचलले नाहीत. त्यामुळे काही नातेवाईकांनी शेतात जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतात रक्ताने माखलेली पॅन्ट आणि मोबाईल एका ठिकाणी दिसून आला. त्यामुळे काहीतरी अप्रिय घडल्याची शंका आल्याने नातेवाईकांनी तात्काळ गावात धाव घेत वनविभागाला माहिती दिली. या भागात वाघिणीची दहशत असल्याने वनविभागाचे पथक परिसरात दाखल झाले होते. वनविभागाने दिनेश यांच्या शेताच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोध मोहीम सुरू केली. ड्रोन कॅमेऱ्यात दिनेश यांचा मृतदेह आणि तिथेच बसलेली वाघीण स्पष्ट दिसली. त्यानंतर वनविभागाच्या जवानांनी सावधगिरी बाळगत त्या भागात जाऊन वाघिणीला ट्रँक्यूलाईझरचा डार्ट (गुंगीचे इंजेक्शन) मारला. डार्ट लागल्यानंतर वाघीण सुमारे ३० ते ४० मीटर पळत गेली आणि बेशुद्ध होऊन खाली कोसळली. त्यानंतर वनविभागाने या नरभक्षक वाघिणीला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. दरम्यान बंदोबस्त करण्यासाठी पुणे येथून रेस्क्यू आले होते. शिरसगाव कसबा येथून ट्रँग्यूलाईज केलेल्या या वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये नेले जात होते. मात्र, पकडताना तिला दोन डार्ट मारण्यात आल्याने बेशुद्धीच्या औषधाची मात्रा जास्त झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणामुळे वाघिणीची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे नागपूरच्या दिशेने सुरू असलेला प्रवास थांबवून वनविभागाच्या पथकाने तज्ज्ञांच्या उपस्थितीत मोर्शी येथील एका मैदानात वाघिणीला ठेवून तिच्यावर आपत्कालीन उपचार सुरू केले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वाघिणीला ऑक्सिजनही लावावा लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तीन मुलींचे पितृछत्र वाघिणीने हिरावले दिनेश आवारे यांना तीन मुली व पत्नी असून, दिनेश हेच कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. कुटुंबातील आधारवड हरपला आहे. लहान मुलींचे पितृछत्र हिरावले गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेहाचे तोडले लचके, मान गायब वाघिणीने दिनेश आवारे यांच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करून त्यांच्या शरीराचे लचके तोडले होते. नागरिक आणि वनविभागाचे पथक जेव्हा मृतदेहाजवळ पोहोचले, तेव्हा दिनेश यांच्या मानेचा भाग पूर्णपणे गायब होता, तसेच एका हाताचे लचके तोडलेले होते. मृतदेह पाहून अंगावर काटा आला.
Source link