![]()
ज्येष्ठ चित्रकार, प्रकाशक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कोषाध्यक्ष नाना जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परिषदेतर्फे एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांच्या सुहृदांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. ही श्रद्धांजली सभा परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाली. यावेळी ज्येष्ठ चित्रकार रविमुकुल यांनी नाना जोशींच्या चित्रकलेतील शैलीचे कौतुक केले. ते म्हणाले, “नाना जोशी यांची चित्रकलेतील शैली वेगळी होती. दिनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, जी. एस. बेंद्रे यांच्या परंपरेतील ते शेवटचे चित्रकार होते.” रविमुकुल पुढे म्हणाले, “त्यांनी रेखाटलेल्या चित्रांमधील रंगसंगती तजेलदार असायची. पोस्टर कलरचा वापर त्यांच्यासारखा दुसऱ्या कुणीच केलेला दिसून येत नाही.” या श्रद्धांजली सभेला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, नाना जोशी यांच्या पत्नी मणी जोशी, ज्येष्ठ चिरंजीव प्रा. अनिरुद्ध जोशी, एकपात्री कलाकार व नाना जोशी यांचे पुतणे प्रभाकर निलेगावकर, संदर्भतज्ज्ञ प्रसाद भडसावळे उपस्थित होते. रविमुकुल यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “माझी चित्रे जेव्हा प्रसिद्ध होऊ लागली, तेव्हा नाना प्रकाशकांना आवर्जून सांगायचे, ‘रवींद्र माझा भाचा आहे.’ प्रकाशकांकडून हे जेव्हा समजायचे, तेव्हा आत्मसन्मान अधिक वाटायचा.” राजीव बर्वे म्हणाले, “सुमारे १५ वर्षांपेक्षा अधिक काळ बाबा कदम यांच्या कादंबऱ्या, नाना जोशी यांची त्यावरील चित्रे आणि प्रकाशक म्हणून दिलीपराज प्रकाशनने साहित्यविश्वावर राज्य केले. पुस्तकांवर नाना जोशी यांची चित्रे असावीत, यासाठी अनेक लेखक त्या काळी आग्रही असायचे.” बर्वे पुढे म्हणाले, “नानांनी चित्रे काढणे थांबविल्यापासून चित्रे पाहून कादंबऱ्यांची विक्री होण्याचा काळ थांबला.” प्रसाद भडसावळे यांनी नाना जोशींना व्रतस्थ कलाकार म्हटले. ते म्हणाले, “काही माणसे आपल्या आयुष्यात फार काळ नसतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप कायमची राहते. नाना जोशींच्या निधनाची बातमी समजली आणि एक कलानिष्ठ, साहित्यप्रेमी, जिद्द आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेला आपला माणूस हरवल्याची जाणीव झाली.” भडसावळे यांनी पुढे सांगितले, “नाना जोशींचे मोठेपण केवळ हजारो मुखपृष्ठे रेखाटण्यात किंवा अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात नव्हते, तर कलेवरची निष्ठा, साहित्याची जाण, संकटांवर मात करण्याची जिद्द आणि माणसांशी जपलेली आपुलकी यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे मोठेपण सामावले होते.” डॉ. स्वाती महाळंक म्हणाल्या, “नाना जोशी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सर्जनशीलतेचा ठसा उमटवला होता. त्यांच्या योगदानामुळे परिषदेची वाटचाल सुरू आहे. भाषेच्या व्याकरणाबाबत त्यांची असलेली तळमळही दिसून आली आहे.”
Source link
ज्येष्ठ चित्रकार नाना जोशींना श्रद्धांजली:महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभेत सुहृदांनी आठवणी जागवल्या; रविमुकुल म्हणाले, रंगसंगती तजेलदार होती.