Headlines

जळगाव सपकाळ येथील उपोषण लेखी आश्वासनानंतर घेतले मागे




भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी, सुरक्षित रस्ता द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर २०२६ पासून सुरू केलेले उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. स्मशानभूमीकडे योग्य, सुरक्षित रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून गैरसोय होत आहे. ८ सप्टेंबर रोजी एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीवेळी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदी, अडथळ्यांचा मार्ग पार करावा लागला. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी कायमचा तोडगा काढण्याची मागणी करत उपोषण सुरू केले. मंगेश साळवे, योगेश वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपोषणाला बसल्या होत्या. “आश्वासन नको, प्रत्यक्ष रस्ता हवा!” अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. प्रशासनाकडे तातडीने रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली. प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी पी. एम. वाघ यांनी उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी रस्ता मंजूर आहे की नाही, याची स्पष्ट माहिती मागितली. रस्ता मंजूर असल्यास प्रशासकीय मंजुरी, निधी, अंदाजपत्रक, कार्यादेश याबाबत माहिती देण्याची मागणी केली. प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. चर्चेनंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस बंदोबस्तात शासन आदेशानुसार स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मोकळा करून दिला जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी योगेश नागरे, तलाठी जळगाव सपकाळ, डॉ. हेमंत सपकाळ, डॉ. शालिग्राम सपकाळ, मधुकर सपकाळ, दादाराव साळवे, केतन साळवे, आर. ए. सपकाळ, पारध पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *