![]()
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या ‘माहेरवाशीण – मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मातृत्वाचा प्रवास प्रत्येक महिलेने भीतीतून नव्हे, तर विश्वासातून करावा. वैद्यकीय उपचारांसोबत माया, आधार, सुरक्षितता आणि सन्मानाची जोड देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. हा अभिनव उपक्रम सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कॅम्पस, लवळे, मुळशी येथे सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार शंकर मांडेकऱ, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. आर. रमण, प्रोव्होस्ट तथा वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर, सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘माहेर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. आपल्या संस्कृतीत ‘माहेर’ म्हणजे माया, आधार, सुरक्षितता, काळजी आणि ‘तू एकटी नाहीस’ हा विश्वास असतो. गर्भावस्थेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत महिलेला वैद्यकीय उपचारांसोबत भावनिक सुरक्षितता, पोषण, विश्रांती, कुटुंबाचा आधार, सन्मान आणि आपलेपणाची गरज असते. या सर्व बाबींना एकत्र आणणारी ‘माहेरवाशीण’ ही संकल्पना आहे. प्रत्येक मातेसाठी रुग्णालय हेच मातृगृह ठरावे, हा त्यामागील विचार असल्याचे त्यांनी सांगितले. निरोगी माता म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी कुटुंब म्हणजे सक्षम महाराष्ट्र. महिला आणि बालकांचे आरोग्य हा केवळ वैद्यकीय विषय नसून कुटुंब, समाज आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाशी निगडित विषय आहे, असे पवार म्हणाल्या. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांपर्यंत मातृत्वविषयक आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आशा कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले. आशा कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना ‘माहेर-दूत’ म्हणून सक्षम करण्याची संकल्पना या उपक्रमात आहे. यामुळे गर्भवती महिलांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि वेळेवर आरोग्यसेवेशी जोडण्यास मदत होईल. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या ‘कुटुंब दत्तक योजना’सारख्या समुदायाभिमुख उपक्रमांशी ‘माहेरवाशीण’ची सांगड घातल्यास भावी डॉक्टरांना महिलेकडे केवळ वैद्यकीय प्रकरण म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती, कुटुंब आणि सामाजिक वास्तव म्हणून पाहण्याची दृष्टी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात ‘माहेरवाशीण’ सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणतीही माता सुरक्षित व दर्जेदार मातृत्व सेवेपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगून पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
Source link
सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन:सुनेत्रा पवार म्हणाल्या, सुरक्षित मातृत्व केवळ आरोग्य नव्हे, तर सामाजिक जबाबदारी; सेवा विनामूल्य.