Headlines

पुणे काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप:डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते वेबसाइटचेही उद्घाटन; जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन




पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. काँग्रेस भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते ही पत्रे समारंभपूर्वक वाटण्यात आली. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (punecongress.in) आणि (deeptichawadhray.in) या वेबसाइटचे उद्घाटनही डॉ. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, पुणे मनपा गटनेते चंदूशेठ कदम, प्रदेश पदाधिकारी अमिर शेख, हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे आणि महिला अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, देशात विविध प्रश्नांवर विद्यार्थी आणि युवकांची आंदोलने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा गैरकारभार, वाढती महागाई, शिक्षण व्यवस्थेची झालेली दुरवस्था आणि नोकरी-रोजगाराविना फिरणारी तरुणाई ही देशाची गंभीर परिस्थिती आहे. ते पुढे म्हणाले, आता देशातील तरुण जागृत झाला आहे. पुण्यात झालेल्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमामुळे देशातील युवक-युवतींना योग्य दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात युवा शक्तीला अधिक संघटित करण्यावर लक्ष दिले पाहिजे. काँग्रेसचा कार्यकर्ता हा जनतेच्या हितासाठी रस्त्यावर दिसला पाहिजे. यानंतर पुणे शहर काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी म्हणाल्या की, मला अध्यक्ष होऊन 100 दिवस झाले आहेत. या 100 दिवसांचा कार्य अहवाल मी खासदार राहुल गांधी यांना नाशिक येथे झालेल्या शिबिरामध्ये दिला आहे. पुण्यातील काँग्रेस पक्ष परिवर्तनाचे चक्र कायम ठेवत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा खासदार व आमदार निवडून आणेल. तसेच पुणे महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवेल, अशी खात्री त्यांनी दिली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करून पक्षाला बळकटी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *