Headlines

गणपती आरतीवरून अभिनेत्री भाग्यश्री आणि मंदिर व्यवस्थापकांमध्ये वाद:4 वर्षांनी येऊन थेट घेतला आरतीचा मान; विजयसिंहराजेंचा लेकीवर आरोप




सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच एक मोठा वाद उफाळून आला आहे. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या कन्या आणि प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी तब्बल चार वर्षांनंतर सांगलीत येऊन मंदिरातील श्रींच्या उत्सव मूर्तीची आरती केली. उत्सवाच्या सुरुवातीला मुख्य मंदिरात श्रींच्या आगमन सोहळ्यापूर्वी त्यांनी हा आरतीचा मान बजावल्यामुळे या प्रकरणाला अचानक वादाचे वळण लागले. या आरतीच्या अधिकारावरून संस्थानचे व्यवस्थापक आणि भाग्यश्री पटवर्धन यांच्यात थेट शाब्दिक चकमक झाली. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी संस्थानचे अधिकृत उत्तराधिकारी म्हणून आधीच युवराज आदित्यराजे पटवर्धन यांची निवड केली आहे. विद्यमान युवराज आणि उत्तराधिकारी असताना भाग्यश्री यांनी आरतीचा मान घेतल्याने हा संघर्ष निर्माण झाला. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणातच संस्थानच्या उत्तराधिकारी पदावरून आणि अधिकारांवरून सुरू असलेला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. भाग्यश्री पटवर्धन दासानी चार वर्षांनी सांगलीत आल्या आणि थेट मंदिरात जाऊन गणपतीची आरती केली. मात्र, यावेळी मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात शाब्दिक वाद झाला. भाग्यश्री यांना आरती करताना रोखण्याचा देखील प्रयत्न झाला, यामुळे हा वाद अधिक चिघळला. यामुळे मंदिर परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाग्यश्री पटवर्धन यांची भूमिका या वादाच्या पार्श्वभूमीवर भाग्यश्री पटवर्धन यांनी आपली बाजू मांडली. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने, गणेशोत्सवाची ही प्राचीन परंपरा खंडित होऊ नये यासाठी त्यांच्या तीन मुलींपैकी एकाने उपस्थित राहणे गरजेचे होते. म्हणूनच आपण आरतीसाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विजयसिंहराजे यांनी अधिकृत उत्तराधिकारी म्हणून नेमलेल्या युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना विरोध करून ही आरती केली का, या प्रश्नावर मात्र भाग्यश्री यांनी थेट भाष्य करणे टाळले. विजयसिंहराजे यांचे गंभीर आरोप भाग्यश्री पटवर्धन यांनी मंदिरात जाऊन आरती केल्याच्या प्रकारावर श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “भाग्यश्री आणि तिचे पती हिमालय दासानी यांनी संस्थानात मोठा गैरकारभार केला होता, आणि याच कारणामुळे त्यांना संस्थानातून काढून टाकण्यात आले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, दत्तकपुत्र आदित्य पटवर्धन हेच या संस्थानचे कायदेशीर उत्तराधिकारी असून, भाग्यश्री यांनी त्यांना मान्य करावे आणि कोणताही त्रास देऊ नये, असे स्पष्ट आवाहनही त्यांनी केले. भावूक झालेले विजयसिंहराजे आणि चव्हाट्यावर आलेला वाद आपल्याच मुलीच्या वर्तनावर बोलताना विजयसिंहराजे अत्यंत भावूक झाले. “उद्या म्हातारा-म्हातारी मेल्यानंतर हे सगळं आमचंच आहे,” असे धक्कादायक वक्तव्य स्वतःच्या मुलीने केल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. याच मानसिक त्रासामुळे आणि संस्थानातील वाढत्या हस्तक्षेपामुळे, दोन वर्षांपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक विधान करून आपण आदित्य पटवर्धन यांना उत्तराधिकारी घोषित केल्याचे त्यांनी सांगितले. ऐन गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात सांगलीच्या या ऐतिहासिक घराण्यातील कौटुंबिक वाद असा चव्हाट्यावर आल्याने, संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *