![]()
गणेशोत्सव उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत जठारपेठ चौकातील स्वराज्य गणेशोत्सव मंडळ गेल्या चार वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही मंडळाने केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता आरोग्य, पर्यावरण, महिला, कायदेविषयक जनजागृती, दिव्यांग आणि व्यापारी वर्गाशी संबंधित उपक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी रक्त तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात किडनी, लिव्हर, थॉयरॉइड, लिपीड प्रोफाइल आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. आरोग्य तपासणीमुळे संभाव्य आजारांचे वेळीच निदान होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. गणेशोत्सवातील प्रत्येक दिवसाला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणत आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांबाबत जागृती करण्याची भूमिका मंडळाने घेतली आहे. स्वराज्य गणेशोत्सव मंडळाकडून गेल्या चार वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. गणेशोत्सव हा केवळ मनोरंजन किंवा धार्मिक कार्यक्रमांचा उत्सव न राहता समाजातील विविध प्रश्नांवर जनजागृती करणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न आहे. यंदाच्या आयोजनातही आरोग्य, पर्यावरण, महिला, कायदेविषयक माहिती, दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, स्वच्छता मोहीम आदी उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांचा उत्सवातील सहभाग सामाजिक उपक्रमांकडे वळवण्यासाठी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. डॉक्टरांचा सन्मान, कायदेविषयक जनजागृती, महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन मंडळाकडून दरवर्षी केले जाते. व्यापाऱ्यांसाठी मेळावा जठारपेठ परिसरातील व्यापाऱ्यांच्या सहभागाने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी व परिसर विकासाबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून सामूहिक आरती होईल. तसेच लकी ‘ड्रॉ’ देखील काढल्या जाणार आहे. बालकांसाठी चित्रकला, प्रश्नमंजूषेसह विविध उपक्रम स्वराज्य गणेशोत्सव मंडळातर्फे लहान मुलांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन केले आहे. बाल चित्रकला स्पर्धा, गणेशविषयक प्रश्नमंजुषा तसेच बाल सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. हा उपक्रम बुधवारी सायंकाळी होणार आहे.
Source link
गणेश उत्सवातून करणार सामाजिक बांधिलकीचा जागर:आराेग्य तपासणी शिबिर, विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश; स्वराज्य गणेशोत्सव मंडळाचे आयाेजन