Headlines

राज्यात 100 टक्के दुष्काळ जाहीर करणे गरजेचे:कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून संकेत, पीक विमा-कर्जासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन




राज्यात नुकतेच ‘महिला शेतकरी विधेयक’ मंजूर झाले असून, या माध्यमातून शेतीत राबणाऱ्या प्रत्येक महिलेला आता ‘शेतकरी’ म्हणून स्वतंत्र ओळख आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल आणि ५० हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटपही लवकरच पूर्ण होईल, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत केली. महिलेची ‘शेतकरी’ म्हणून ओळख निर्माण होणार ‘महिला शेतकरी विधेयका’चे फायदे स्पष्ट करताना भरणे म्हणाले की, “आजही आपल्या पुरुषप्रधान देशात शेतीचा सातबारा बहुतांश वेळा पुरुषांच्याच नावावर असतो. पण आता ज्या महिलांच्या नावावर सातबारा नाही, पण त्या शेतमजूर म्हणून किंवा पोल्ट्री, दूध, मत्स्यव्यवसाय यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांत काम करतात, त्यांनाही ‘महिला शेतकरी’ म्हणून ओळखपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या पीक विमा, कर्ज आणि इतर कृषी योजनांचा थेट फायदा मिळेल आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.” दुष्काळ जाहीर करणे गरजेचेच राज्यातील पावसाच्या खंडाबाबत बोलताना कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “गेले ४०-५० दिवस पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे. अशा वेळी १०० टक्के दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आढावा घेतला असून, येत्या दोन-तीन दिवसांत मी स्वतः ५-७ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पीक परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” दुग्ध व्यवसाय आणि चारा छावण्यांबाबतचे नियोजन पावसाअभावी दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्याच्या प्रश्नावर बोलताना भरणे म्हणाले, “सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे, मात्र दिवाळीच्या आसपास पशुधनाच्या चारा आणि पाण्यासाठी छावण्या उघडण्याबाबत सरकारला निश्चितपणे निर्णय घ्यावा लागेल. सध्या आमचे पहिले प्राधान्य शेतकऱ्यांना तत्काळ मदत आणि आधार देण्याला आहे.” ५० हजारांच्या अनुदानाचे वाटप लवकरच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदानाच्या योजनेबाबत विचारले असता, त्यांनी ही योजना अजिबात रखडली नसल्याचे स्पष्ट केले. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सुरू असलेल्या या योजनेचा फायदा राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी सुमारे ४०,८८५ कोटी रुपयांची गरज असून, आतापर्यंत १० ते ११ हजार कोटींचे वाटप झाले आहे. केवायसी (KYC) आणि उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून नियमित कर्ज भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच हे अनुदान दिले जाईल,” असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला. —————– हेही वाचा.. मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित: मराठा आरक्षणासाठी सरकारला 3 महिन्यांची मुदत; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली 20 दिवस उपोषणाला बसले होते. आज सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र आंदोलन सुरुच राहणार आहे. तर 3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर भविष्यात सरकारने जर दगा फटका केला तर आता उपोषण करणार नाही थेट मुंबईत आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. जरांगे यांची तब्येत खालावलेली असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *