Headlines

सटाण्यात भारनियमनाविरोधात अधिकाऱ्यांना घेराव‎:मोसम-करंजाडी खोऱ्यातील अघोषित भारनियमन तत्काळ थांबवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी




नामपूरसह मोसम व करंजाडी खोऱ्यातील असंख्य गावांमध्ये रोज सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांसह शेतकरी संतप्त आहे. अघोषित भारनियमन तातडीने बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी सटाणा येथे वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नामपूरसह मोसम व करंजाडी खोऱ्यातील गावांमध्ये भारनियमनाच्या निर्धारित वेळेव्यतिरिक्तही दररोज सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत आहे. सायंकाळची वेळ ही शेतकऱ्यांसाठी कामाची, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची महत्त्वाची वेळ असते. मात्र, यावेळी वीज गायब होत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.पारनेर, निताने, बिजोटे, आखतवाडे, गोराणे, फोपीर, कोटबेल आदी गावांसह परिसरात बिबट्याची दहशत आहे. सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात असून ठिकठिकाणी गणपतीची आरास व रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, दररोज सायंकाळी वीज खंडित होत असल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावरही विरजण पडत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता रवींद्र शिरसाठ यांना देण्यात आले. यावेळी माजी सरपंच किशोर ह्याळीज, ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष नानाभाऊ ह्याळीज, संदीप भामरे, दिगंबर सोनवणे, नंदराज देवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *