![]()
महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या जमिनी व त्यांच्या मोबदल्याबाबत पातूर येथील नवीन तहसील इमारतीमध्ये बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बाधित शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत आमदार नितीन देशमुख यांनी बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अत्यंत आक्रमक व कडक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला. बैठकीत भूमिका स्पष्ट करताना आमदार नितीन देशमुख म्हणाले की, “आमचा या नदीजोड प्रकल्पाला अजिबात विरोध नाही; उलट या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सिंचनासाठी आम्ही या प्रकल्पाबाबत पूर्णपणे सकारात्मक आहोत. मात्र, आमचा मुख्य लढा हा शेतकऱ्यांच्या घामाच्या आणि सुपीक काळ्या आईच्या जमिनीला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आहे. जमिनीचा रास्त व समाधानकारक मोबदला मिळणे हा शेतकऱ्यांचा घटनादत्त अधिकार असून तो त्यांना मिळालाच पाहिजे. शासनाने शेतजमिनीच्या भूसंपादनासाठी निश्चित केलेले सध्याचे शासकीय मूल्यांकन दर अत्यंत तुटपुंजे असून शेतकरी त्यावर समाधानी नाहीत. शेती हे या ग्रामीण भागातील शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. प्रकल्पामुळे हक्काची शेती गेल्यास त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शासनाने जमिनींचे सध्याचे वास्तविक बाजारमूल्य, रेडीरेकनर आणि प्रचलित दर विचारात घेणे क्रमप्राप्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या दराने मोबदला देण्यात आला होता, त्याच्या किमान चारपट रक्कम या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात मिळालीच पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांना हा न्यायसंगत मोबदला जाहीर होत नाही आणि शेतकरी समाधानी होत नाहीत, तोपर्यंत पातूर तालुक्यातील एकाही शेतकऱ्याच्या शेताला हात लावू दिला जाणार नाही. तसेच तालुक्यात प्रकल्पाची कोणतीही मोजणी होऊ देणार नाही,’ असा सज्जड दम आमदार नितीन देशमुख यांनी व्यासपीठावरून अधिकाऱ्यांना दिला. अल्प जमीन गेली तरी प्रकल्पग्रस्तांचा लाभ द्या ज्या शेतकऱ्यांची अत्यंत कमी (अल्प किंवा अत्यल्प) जमीन प्रकल्पासाठी संपादित होईल, त्या बाधित कुटुंबांनाही अनुकंपा व प्रकल्पग्रस्त धोरणांतर्गत सामावून घेऊन लाभ दिला गेला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी केली. भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
Source link
महामार्गाच्या चारपट मोबदला द्या अन्यथा शेताला हात लावू नका:शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार नितीन देशमुख यांचा इशारा