Headlines

Samarth Chaudhary Journey From Sambhajinagar To Mr India Universe


लहानपणापासूनच कला क्षेत्रात नैपुण्य. मॉडेलिंग, ॲक्टिंग, गायनामध्ये पारंगत. जणू गणपती बाप्पाचा वरदहस्तच. आपल्यातील कलागुण ओळखून त्यामध्येच करिअर घडवण्याचा निर्णय अगदीच लहानपणी घेतला. ज्या वयात खेळायचं, बागडायचं त्या वयात करिअरलाच आपली मौज मानून घेतली

.

समर्थ सरस्वती भुवन शाळेमध्ये शिकला. चौथीपासूनच त्याला ॲक्टिंगमध्ये रस होता. त्याने अनेक कर्मशिअल प्रोजेक्ट देखील केले. मात्र, दहावी बोर्ड असल्यामुळे घरच्यांनी अभ्यासावर लक्ष द्यायला सांगितले. मात्र, समर्थला त्याची आवड शांत बसू देत नव्हती. निकाल येण्यापूर्वीच त्याने मॉडेलिंगसाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी ‘MR.AURANGABAD’ या स्पर्धेविषयी त्याला कळलं. आणि त्यामध्ये भाग घेण्याचं ठरवलं. ते म्हणतात ना, की जेव्हा एखादी गोष्ट मनापासून केली की त्याच फळ मिळतंच. तसंच काहीसं समर्थसोबत झालं. या स्पर्धेत ‘MR.AURANGABAD’ चा किताब समर्थच्या नावे झाला.

समर्थ सांगतो,’मी जेव्हा ‘MR.AURANGABAD’ साठी गेलो तेव्हा मला मॉडेलिंगबद्दल कुठलंच नॉलेज नव्हतं. पण मी ऑडिशनला गेलो. तिथे माझं सिलेक्शन झालं आणि ‘MR.AURANGABAD’ म्हणून वयाच्या 15 व्या वर्षी टायटल मिळवलं. मग त्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला, की आपण मॉडेलिंगसुद्धा करू शकतो. त्यानंतर मी ‘MR. INDIA’ बद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली. 2017 मध्ये Gladrags Manhunt and Megamodel Contest मध्ये मी भाग घेतला आणि तिथे 1st Runner-up झालो. इथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.’

यानंतर समर्थने अनेक जाहिराती, शो केले. इथून करिअरला पीक पॉईंट मिळतो न मिळतो तोच Covid मुळे संपूर्ण जग चार भिंतीत बंद झालं. तस समर्थचं कामही बंद झालं. याबद्दल बोलताना तो सांगतो, ‘लॉकडाऊनमुळं सगळे शूट बंद झाले होते. तो अतिशय डार्क पीरियड होता सगळ्यांसाठी. त्यानंतर मग मी AD म्हणून काही दिवस काम केलं. मग मला काही कॉन्टॅक्ट मिळाले. त्या आधारे मी एक चित्रपट केला आणि मागच्या वर्षी ‘MR.INDIA UNIVERSE’ ही स्पर्धा पहिल्यांदाच आपल्याकडे होत होती. त्यामध्ये भाग घेण्याचं ठरवलं. त्यानुसार तयारी चालू केली आणि मी तिथेही 1st Runner-up झालो. असा माझा पुन्हा मॉडेलिंगमध्ये कमबॅक झाला.’

मात्र, समर्थचा हा प्रवास केवळ यशाच्या शिखरावर पोहोचण्यापुरता मर्यादित नव्हता. मॉडेलिंगसोबतच अभिनय आणि गायनाची आवडही त्याने तितक्याच ताकदीने जोपासलीय. या क्षेत्रात काम करत असताना त्याला अनेक नव्या संधी मिळत गेल्या आणि त्यातूनच मनोरंजन क्षेत्रातील त्याचा प्रवास अधिक व्यापक होत गेला. त्याच्या या प्रवासात अनेक महत्त्वाचे टप्पे आले, ज्यांनी त्याला आजच्या ‘MR. INDIA’पर्यंत पोहोचवले.

घरच्यांचा विश्वास जिंकणं महत्वाचं होत…!

समर्थचा इथंपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या. मात्र अडचणींना एक प्रॉब्लेम म्हणून डोक्यावर घेण्यापेक्षा त्याने सोल्युशनवर अधिक भर दिला. तो सांगतो ,’माझ्या घरात सगळेचजण शैक्षणिकदृष्ट्या खूप स्ट्राँग होते. बाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रोफेसर, आईने पत्रकारिता आणि सायकोलॉजीमध्ये शिक्षण घेतलं. माझा दादा MBA करून एका चांगल्या कंपनीत सेटल आहे. पण माझी फिल्ड त्यांच्यापेक्षा खूप वेगळी. त्यामुळे त्यांना वाटत होतं, मी पण असंच काहीतरी करावं. पण माझा निर्णय ठाम होता. मी हे करू शकतो हा विश्वास घरच्यांना देण्यासाठी त्यांना एकदा माझ्या एका थिएटर शो ला मी बोलावलं. तो एवढा चांगला झाला की घरच्यांना समजलं, की हा यामध्ये करिअर करू शकतो. त्यामुळे आधी त्यांनी मला विरोध केला पण नंतर त्यांनीच साथ दिली.’

वयाच्या 16 व्या वर्षी समर्थनं आपल्या स्वप्ननासाठी घर सोडलं आणि स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईला गेला. मुंबई जरी स्वप्ननगरी असली तरी तिथे राहण्याची, खाण्याची सोय करणे म्हणजे मोठ्या दिव्यातून जाणंय. त्यामुळे एवढ्या लहानपणी हा भार सांभाळणं कठीण होतं. मात्र इच्छा तिथे मार्ग असतो. समर्थला त्याच्या आईच्या मित्र परिवाराच्या ओळखीमुळं घर मिळालं. याबद्दल बोलताना तो सांगतो, ‘माझ्या आईचे एक जुने मित्र होते त्यांचा एक फ्लॅट 27 वर्षांपासून बंद होता. 80च्या शतकात जसे बटण होते ना, तसे घरात होते. सगळीकडे जाळे. घर एखाद्या खंडरसारखे होते. ती सोसायटी अशी होती, की घरांची रचना अतिशय विचित्र. कुठेही काहीही होतं. ती म्हणजे ठाण्यातली वृंदावन सोसायटी. मी तिथं राहायला लागलो.’

या सगळ्या सेटलमेंटनंतर ठाणे ते अंधेरी असा समर्थचा रोजचा प्रवास सुरू झाला. समर्थ मुंबईला तर आला होता. मात्र, त्याला इथलं काहीच माहिती नव्हतं. वर्सोवा आराम नगरपर्यंत रोजच जाणं-येणं सुरू झालं. हळुहळू ओळखी वाढवल्या, अनेक आर्टिस्टचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले.

यावेळचा एका प्रसंग आठवताना समर्थ सांगतो, ‘एक दिवस मी गूगल मॅपवर ‘कास्टिंग बे’चं ऑफिस शोधण्यासाठी निघालो. तिथं एका टपरीवर फुल ॲटीट्यूडमध्ये एक ॲक्टर उभा होता. मी त्याच्याकडे गेलो आणि विचारला की ‘कास्टिंग बे’चं ऑफिस कुठे आहे? त्यानं एकदम संपूर्ण मान हलवली आणि म्हणाला की ‘मैं भी उधर जा रहा हूं’. तो दहा मिनिटांचा वॉक होता. तेवढ्या वेळेत त्याने मला त्याची लाईफ जर्नी सांगितली. त्यानंतर पुढच्या 4-5 वर्षानंतर मी त्याच जागी उभा होताोआणि एक मुलगी आली आणि तिने तोच प्रश्न मला विचारला. तेव्हा मी देखील त्याच ॲटीट्यूडमध्ये तिला उत्तर दिलं आणि दहा मिनिटांत माझी स्टोरी सांगितली. नंतर मला आठवलं की यार आपल्यासोबत पण असंच झालं होत. फक्त कॅरेक्टर चेंज झालं.’

शूटिंगच्या 3 दिवस आधी फिल्ममधून काढून टाकलं!

सुरुवातीला अनोळखी असलेलं हे शहर हळूहळू त्याच्यासाठी संधींचं शहर बनत गेलं. ऑडिशन, भेटीगाठी आणि सततच्या धावपळीतून त्याच्या करिअरला एक नवा आकार मिळत गेला. जिथे अनोळखी म्हणून गेला होता, तिथे तो अनुभवी म्हणून ओळखला जात होता. ज्यांना टीव्हीवर पाहून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले त्यांच्यासोबत बसून समर्थने ऑडिशन दिल्या. तेव्हा त्याला कळले, की ही एवढी मोठी कलाकार लोक ज्यांचे आयुष्य गेले तरी ते अजून ऑडिशन देतात. तर मग आपण काहीच नाहीत. समर्थला या इंडस्ट्रीमध्ये येऊन दहा वर्ष झाली आहेत. या दरम्यान त्याने अनेक प्रोजेक्टवर काम केलं आहे. अनेकदा रिजेक्शन देखील झेलावे लागले.

याबद्दल बोलतांना समर्थ सांगतो,‘मी बॉइज स्कूल मधला होतो. त्यामुळे मुलींसोबत बोलण्याचा काहीच संबंध नव्हता. त्यांच्याशी बोलायचं म्हणजे मी खूप जास्त नर्वस होयचो. तर एकदा अशीच एक ऑडिशन द्यायला मी गेलो. ती सिल्कची ॲड होती. माझा सिंगल परफॉर्मन्स खूप चांगला झाला. मी सिलेक्ट झालोच होतो. पण त्यानंतर त्यांना जे शॉर्ट लिस्ट झालेत त्या दोघांना म्हणजे मुलीला आणि मुलाला या दोघांना एकदा सोबत घेऊन टायप करायचं होत. तेव्हा मी जास्त नर्वस झालो. कधी कोणत्या मुलीशी मी बोललोच नव्हतो, तर एकदम कसं तिला पकडून वगैरे ती ॲड करायची. तर ते काही मला जमत नव्हतं. ऑडिशन घेणारे मला म्हणायला लागले, की तुला अचानक काय झालं? तू खूप छान करत होतास. तिथे मी रिजेक्ट झालो.’

समर्थला जाहिरातीमधून काढण्यात आलं. त्यानंतर मिस्टर इंडियाच्या स्पर्धेआधीही समर्थला एका चित्रपटातून रिजेक्शन झेलावं लागलं. तो सांगतो ,‘मला स्पर्धेच्या तीन महिने आधी एक सिनेमा मिळाला होता. ज्यामध्ये मी लीड होतो. व्हिलन म्हणून एक खूप मोठा मराठी कलाकार होता. त्यामध्ये माझा क्लासिकल सिंगरचा रोल होता. मला गाणं येत असल्यामुळे मी त्यावर खूप मेहनत घेतली होती. डायरेक्टरनं मला सांगितलं होतं, की कुठलीही चूक नाही झाली पाहिजे. तू स्वतः गातोयेस असं वाटलं पाहिजे. त्याप्रमाणे माझं काम चालू होतं. या सगळ्यामध्ये दोन महिने गेले. मी खूप जास्त मेहनत घेतली होती आणि शूटच्या अगदी तीन दिवस पहिले ती फिल्म एका मोठ्या स्टार कीडला मिळाली. त्यामुळे माझं सगळं गणितच बिघडलं. या फिल्मसाठी मी बाकीचे सगळे प्रोजेक्ट कॅन्सल केले होते. तर तिथं माझं खूप मोठं नुकसान झालं.’

या दरम्यान समर्थला केवळ रिजेक्शनच नाही, तर आरोग्याच्या समस्येतूनही जावं लागलं. चित्रपटाच्या रोलसाठी एका सीनमध्ये समर्थला किंचाळावं लागलं. त्यामुळं त्याच्या वोकल कॉर्डला इजा पोहोचली. तिथे पॉलिप झाले होते. त्यामुळे रिकव्हर करण्यासाठी समर्थला डॉक्टरांनी तब्ब्ल तीन महिने मौन व्रतच ठेवायला सांगितले गेले. तीन महिने समर्थ एका डायरीच्या साहाय्याने सगळ्यांशी संवाद साधत होता. एका चुकीच्या निर्णयानं आयुष्य बदलावं तसं झालेलं. पात्रामध्ये पूर्णपणे बसण्यासाठी त्यानं आपल्या जीवाची देखील पर्वा केली नव्हती. एवढं करूनही शेवटी त्याच्या पदरी निराशाच आली. पण तरीही तो थांबला नाही. त्याने आपला प्रवास चालूच ठेवला.

समर्थ म्हणतो की आयुष्यात अनेक प्रसंग असे येतात, ज्यांचा आपण कधी विचार पण केलेला नसतो. पण अशावेळी माघार न घेता पुढे चालत राहणेच योग्य असते. त्यानंतर समर्थला एक प्रोजेक्ट मिळाला. त्याच्या शूटिंगच्या तारखा देखील ठरल्या होत्या. मात्र, पुन्हा वोकल कॉर्डने डोकं वर काढलं. तेव्हा समर्थने ठरवलं की आपण याची सर्जरी करूयात.

हा प्रसंग सांगताना समर्थ म्हणतो, ‘मी कॉन्ट्रॅक्ट साइन करून आलो. सर्जरी केली. आणि 15 दिवसात शूट होतं. मला वाटलं की मी एवढ्या दिवसात रिकव्हर करेल. मी पुन्हा मौन व्रतवर होतो. माझा आवाज पूर्णपणे बदलला होता. डॉक्टर म्हणे की तुला घशावर ताण द्यायचा नाही. जर तू किंचाळला तर पुन्हा ते डॅमेज होण्याची शक्यता आहे. तेव्हा असा काही सिन नव्हता म्हणून मी नॉर्मल होतो. पण जेव्हा मी शूटला गेलो तेव्हा किंचाळण्याचाच सिन करायचा होता. मला काही कळेना काय करावं. मग मी डायरेक्टरला विनंती केली. पूर्ण परिस्थिती सांगितली. पण तो सिन करण गरजेचं होतं. मग मी तो पूर्ण सिन एकही शब्द न बोलता केला. हे खूप जास्त कठीण होतं. कारण आवाज न करता किंचाळणं, मग त्यामध्ये त्या गळ्याच्या शिरा दिसल्या पाहिजेत. हे सगळं होतं. तो सिन तर शूट झाला. पण ते करणं खूप कठीण होतं.’

समर्थच्या या गोष्टीवरून हे कळतं, की परिस्थिती कधीही बदलू शकते. आपण ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. त्यानंतर समर्थने मेहनत घेतली आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. एका शोचा किस्सा सांगताना तो म्हणतो, ‘एकदा गावाकडे एक शो होता. प्ले करून मी मेकअप रूममध्ये आलो. पूर्ण मेकअप काढला. तेवढ्यात एक माणूस आला आणि तो म्हणायला लागला की तो फॉरेस्ट ऑफिसर कुठंय? मला वाटलं काहीतरी आपण चूक केलीय आणि आता आपण मार खाणार आहोत. म्हणूनच हा एवढ्या तावातावात आलाय. मी गेलो आणि म्हणालो की मीच आहे. तो म्हणतो नाही-नाही तुम्ही. त्याला मिशा होत्या, एकदम उंच होता. त्याला म्हणलं तो मीच आहे. आता फक्त मेकअप काढला आहे. तेव्हा तो व्यक्ती मला म्हणाला की ‘काय भारी परफॉर्म केला ओ तुम्ही. मज्जा आली.’ तर ती माझी अचिव्हमेंट. प्ले केल्यानंतर माझं कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहत. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या चेहऱ्यानं कोणी मला ओळखलं नाही तरी चालेल पण माझ्या कामानं मला लोकांनी ओळखलं पाहिजे.

मी ज्याला शिकवलं तोच मिस्टर इंडिया झाला!

समर्थने त्यानंतर ‘मिस्टर इंडिया युनिव्हर्स’साठी ट्राय केलं आणि समर्थला कष्टाचं फळं मिळालं. मिस्टर इंडियासाठी समर्थने मेहनत घेतली. त्यासाठी प्रॉपर डाएट, वाचन, करंट अफेअर्स, रोज नवीन विषय हाताळायचा, आवाजाचे चढ -उतार, यासारख्या अनेक गोष्टी केल्या. जे मिस्टर इंडियासाठी कारण गरजेचं होतं.

यावर बोलताना तो म्हणतो,’मिस्टर इंडिया स्पर्धेत केवळ तुमची पर्सनॅलिटी महत्त्वाची नसते. त्यामध्ये तुमचे विचार आणि तुमचं नॉलेज खूप महत्त्वाचं असत. यामध्ये प्रश्न उत्तर देखील असतात. त्यामध्ये चार प्रश्न महत्त्वाची असतात. पहिला प्रश्न हा पर्सनॅलिटीशी संबंधित असतो. दुसरा पेजंटशी संबंधित प्रश्न. तिसरं म्हणजे करंट अफेअर्स आणि चौथा म्हणजे हापोथेटिकल प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला केवळ पाच सेकेंदात द्यावी लागतात. तिथे तुम्ही कोणताही वाद निर्माण होईल असं बोलू शकत नाही.’

पुढे तो सांगतो, “जगातील लोकांना भारतीयांबद्दल असलेला एखादा चुकीचा समज कोणता आहे आणि तो बदलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? तसेच, या मंचावरून जगाला भारताबद्दल काय सांगाल? हा प्रश्न माझ्या आधी दहा जणांना विचारण्यात आला होता. आणि मी ज्या उत्तराची प्रॅक्टिस केली होती ते सगळे आधीच देऊन झाले होते. मग माझ्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नव्हतं.

जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी ब्लॅन्क झालो होतो. पण शांत राहून मग मी उत्तर दिलं की, ‘भारतीयांबद्दल एक गैरसमज असा आहे की आपण खूप मोठ्याने बोलतो आणि आपल्याकडे सामाजिक भान नाही. काही अंशी हे खरंही आहे. आपण मोठ्यानं बोलतो आणि अनेक भारतीयांमध्ये मूलभूत सामाजिक भानाचा अभाव आहे. पण आपल्यात स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची इच्छा आहे. या जगातील कोणतेही राष्ट्र परिपूर्ण किंवा महान म्हणून जन्माला आलेले नाही. स्वतःमध्ये असलेल्या त्रुटी बदलण्याची आणि देशाला अधिक चांगलं बनवण्याची इच्छा हीच राष्ट्राला महान बनवते. म्हणूनच, मला त्या इच्छेचे प्रतिनिधित्व करायचे आहे आणि आपण एका अधिक चांगल्या भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत, हे जगाला दाखवायचं आहे. म्हणून भारताला भेट द्या, भारतीयांना भेटा आणि आमच्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलण्याची संधी आम्हाला द्या.’ तेव्हा हा प्रश्न मला खूप जास्त कठीण वाटलं होता.”

समर्थचा स्वभाव मुळातच प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचा आहे. त्यामुळे मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येकाला धीर देणे आणि कोणाला जर कुठलं उत्तर येत नसेल तर तो अगदी मनापासून त्यांची मदत करत होता. या दरम्यान सर्मथचा जो रूममेट होता त्यालाच मिस्टर इंडिया म्हणून घोषित करण्यात आलं. आणि 1st Runner-up म्हणून समर्थची निवड झाली. यावेळी आपल्या मित्राची निवड झालीय म्हणल्यावर समर्थचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात थोडं दुःख होतं की आपण मिस्टर इंडिया होऊ शकलो नाही. पण मित्राच्या आनंदात तो आपलं दुःख बाजूला ठेऊन ते एन्जॉय करत होता.

विशेष म्हणजे, ज्यांना तो स्पर्धेदरम्यान मदत करत होता, त्यांच्यापैकीच एक जण पुढे ‘MR. INDIA’ म्हणून त्याच्यासमोर उभा राहिला. या सगळ्या प्रवासात समर्थला मिळालेला अनुभव पुढे त्याच्या कामातही तितकाच उपयोगी ठरला.

ॲक्टिंग की मॉडलिंग?

समर्थ म्हणतो की त्याने सुरुवात एक ॲक्टर म्हणून केली. त्यामुळे अभिनय करून त्याच्या मनाला अधिक शांतता आणि समाधान मिळते. जर यदाकदाचित उद्या दोन्हीपैकी काही निवडण्याची गोष्ट आली तर मी नेहमीच ॲक्टिंगलाच निवडेल. कारण तिथे मला खूप फ्रीडम आहे. मला वाटलं की आता मला या सीनमध्ये थोडा चेंज करायचा आहे तर मी तो करू शकतो. पण मॉडलिंगमध्ये तसं होत नाही. तिथं तुम्हाला नियमानुसारच चालावं लागतं.

समर्थ चौधरीला कधी प्रेम झालं का?

समर्थ हा मुळातच एक इमोशनल आणि शाय पर्सन आहे. त्यामुळे कधी कोणाच्या प्रेमात पडला आहेस का, हे विचारल्यावर तो सांगतो, ‘हो…मी जेव्हा AD म्हणून मी माझ्या एका मित्राकडे काम करत होतो. त्याचे वडील खूप मोठे डिझायनर होते. तेव्हा मी राहत होतो मीरा रोडला. माझं ऑफिस होत गोरेगावला. त्यामुळं बऱ्यचवेळेला मी रात्री माझ्या मित्राकडे राहायचो. दुसऱ्या दिवशी त्याच्याच रूममधून ऑफिसला जायचो आणि म्हणायचो की मी मीरा रोडवरून आलोय. एकदिवस माझा मित्र कॉफी घेऊन आला आणि म्हणाला की ‘अरे हमारे यहा एक सुंदर लाडकी आई है.’ मी पहिले म्हंटल असेल कोणी. पण नंतर मग मी गेलो आणि थोडं वाकून पाहिलं. तसाच वापस रूममध्ये आलो आणि मित्राला म्हणालो की,’तेरे भाई को अभि प्यार हुआ है’.

पुढे तो सांगतो,’त्यानंतर मग मी मस्त टाप-टीप तयार होऊन वगैरे गेलो. तिची आणि माझी नजर एकच झाली. ती मराठीमध्ये काहीतरी बोलली. तेव्हा मी म्हणालो की तू पण मराठी आहेस. ती म्हणे हो. मग आमचं पुढे बोलणं वाढलं. आमच्यात एवढं साम्य होतं की तिचा वाढदिवस माझ्या वाढदिवसाच्या एक दिवस नंतर होता. जर मी मुलगी असतो, तर एकदम तिच्यासारखा असतो. एवढं साम्य होतं. पण काही गोष्टी वर्कआऊट होत नाहीत. आमचंही तसंच झालं.’

काही नाती आयुष्यभरासाठी सोबत राहत नाहीत. मात्र, ती आपल्याला काहीतरी शिकवून जातात. समर्थच्या बाबतीतही या नात्याने त्याला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. तो मुळातच भावनिक असल्याने नाती त्याच्यासाठी नेहमीच खास राहिली आहेत. मात्र, नात्यांपेक्षा त्याने स्वतःच्या ध्येयाला कधीच मागे पडू दिलं नाही. त्यामुळे आयुष्यात कितीही काही घडलं, तरी काम आणि स्वतःला सतत घडवत राहण्याचा त्याचा प्रवास सुरूच राहिला.

समर्थ आज एक मॉडेल, अभिनेता आणि एक मिस्टर इंडिया (1st Runner-up) म्हणून ओळखला जातो. समर्थ म्हणतो की, ‘हे तिन्ही टायटल काढले तर मी एक साधारण घरात वाढलेला, 90s कीड, जो दीड रुपयाच्या कॉइनचा बॉल तयार करून धप्पा कुट्टी खेळणारा समर्थ आहे. मी वयाने जरी झेन-झी असलो तरी मी मनाने 90s आहे. गझल ऐकणे, कव्वाली ऐकणे हेच माझे छंदयत.’

समर्थला भविष्यात अनेक रोल करायचे आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये अगदी पाण्यासारखं राहण्याची त्याची इच्छा आहे. लोकांनी चेहरा किंवा नावानं नाही, तर कामानं ओळखलं पाहिजे अशी त्याची धारणा आहे. आज ‘MR. INDIA’च्या मंचावर पोहोचलेला समर्थ चौधरी स्वतःकडे मात्र कोणत्याही मोठ्या टायटलच्या नजरेतून पाहत नाही. त्याच्यासाठी मॉडेलिंग, अभिनय आणि मिळालेली ओळख ही त्याच्या प्रवासातील काही टप्पे आहेत. मात्र, या सगळ्यापलीकडे तो आजही तोच साधा समर्थ आहे, ज्याने लहानपणी आपल्या कलागुणांना ओळखलं आणि त्यांनाच आपल्या आयुष्याची दिशा बनवलं. मुंबईत येताना सोबत असलेली स्वप्नं, मिळालेल्या संधी, असंख्य ऑडिशन्स, रिजेक्शन्स, आरोग्याच्या अडचणी आणि पुन्हा नव्याने उभं राहण्याची जिद्द या सगळ्यांनी त्याला घडवलं.

समर्थच्या या प्रवासात यश जितकं आहे, तितकाच संघर्षही आहे. एखाद्या जाहिरातीमधून रिजेक्ट होणं असो, शूटिंगच्या तीन दिवस आधी चित्रपट हातातून जाणं असो किंवा आवाज गमावण्याची वेळ येणं असो; प्रत्येक वेळी त्याने परिस्थितीला दोष देण्यापेक्षा स्वतःला पुन्हा उभं करण्याचा मार्ग निवडला. कदाचित म्हणूनच आज मिळालेल्या प्रत्येक यशामागे त्याला त्या संघर्षांची किंमत अधिक जाणवते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.