![]()
सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळाने यंदा ‘ललिता त्रिपुरसुंदरी – भंडासूर वध’ हा सजीव देखावा साकारला आहे. मंडळाचे हे ९६ वे वर्ष आहे. या देखाव्यात अधर्म, अहंकार आणि अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवगणांना मुक्त करण्यासाठी ललिता त्रिपुरसुंदरी देवी आपल्या शक्तिरूपातून प्रकट होतात, असे दाखवले आहे. त्यांच्यासोबत मंत्रीणी देवी आणि वाराही देवी अधर्माचे प्रतीक असलेल्या भंडासूर राक्षसाशी मोठा संघर्ष करतात. अखेरीस त्याचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय प्रस्थापित करतात. हा देखावा स्त्री शक्तीचा संदेश देतो. अहंकार, अन्याय आणि अत्याचार कितीही शक्तिशाली वाटले तरी, सत्य, धर्म आणि स्त्रीशक्तीसमोर त्यांचा पराभव निश्चित असतो, हे यातून दाखवले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सत्याची साथ द्यावी, हा या देखाव्याचा मुख्य संदेश आहे. या सादरीकरणात शुभम सोनार आणि राकेश रामनकाटे यांच्यासह युवा कलाकारांनी भाग घेतला आहे. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने हा सजीव देखावा पाहण्यासाठी यावे, असे आवाहन खजिना विहीर तरुण मंडळाचे अध्यक्ष ओम सुरेश कासार यांनी केले आहे. ‘सामाजिक गणेश’ अंतर्गत माती गणपती मंडळातर्फे आरोग्य दूतांचा सन्मान गणेशोत्सव ही केवळ परमेश्वराची पूजा करण्यासाठी नाही. मानवतेची पूजा करण्यासाठी समर्पित व्हावा, या उद्देशाने तब्बल ९२ वर्षांची परंपरा जपणाऱ्या नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने ‘सामाजिक गणेश’ संकल्पनेंतर्गत सफाई कर्मचारी व आरोग्य दूत यांचा सन्मान केला. याशिवाय महिलांसाठी रंगावली स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. मंडळाला रमणबाग युवा मंच, श्रीराम पथक व नूमवि वाद्य पथकाची साथ लाभली. वादन फक्त जल्लोषासाठी नाही, तर हे वादन आभार मानण्यासाठी देखील आहे, असा विचार समोर ठेवून ढोल- ताशांचा गजर म्हणजे आरोग्यदूतांच्या मेहनतीला सलाम करण्यात आला. पाऊस असो, सण असो की सुट्टी सफाई कर्मचारी आणि आरोग्य दूत रस्त्यावर, दवाखान्यात नागरिकांसाठी झटत असतात. कचरा उचलणे, शहर स्वच्छ ठेवणे हे काम सोपे नाही. हे काम म्हणजे खरी सेवा आहे आणि सेवा हाच खरा धर्म आहे. त्यामुळे सामाजिक गणेश या संकल्पनेंतर्गत हा उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात आला.
Source link
खजिना विहीर मंडळाचा 'ललिता त्रिपुरसुंदरी – भंडासूर वध' सजीव देखावा:सदाशिव पेठेत साकारला; 96 व्या वर्षात स्त्री शक्तीचा जागर