![]()
केज तालुक्यातील टाकळी येथील बहुचर्चित विलास घुले हत्या प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) १० आरोपींविरुद्ध ४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचे नाव वगळण्यात आल्याने त्याला सध्या तरी पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली आहे. १५ सप्टेंबर रोजी केज न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले. टाकळी येथील हॉटेलचालक विलास घुले यांची जून महिन्यात हत्या झाली होती. या घटनेनंतर मृताच्या नातेवाइकांनी ५६ तास मृतदेह ताब्यात न घेता सौरभ सोनवणे कारवाईची मागणी करत तीव्र आंदोलन केले होते. तणाव पाहता सुरुवातीला केज पोलिस आणि नंतर आयपीएस अधिकारी व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने या प्रकरणाचा २ महिने सखोल तपास केला. त्यानंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. आरोपपत्रात या १० जणांची नावे बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भय्यासाहेब गायकवाड, अजय ऊर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम, संतोष कदम आणि तपासात नव्याने निष्पन्न झालेला राजकुमार मोरे या १० जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. जबाबात सौरभ सोनवणेंचे नाव होते, आता दिलासा या प्रकरणात सुरुवातीला नऊ जणांवर गुन्हा दाखल होता. आंदोलनाच्या दबावानंतर पोलिसांनी पुरवणी जबाबात सौरभ सोनवणेचे नाव घेतले होते. एसआयटीनेही त्याची ४ तास चौकशी केली होती. मात्र, आता सीआयडीच्या आरोपपत्रात त्याचे नाव नसल्याने खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या प्रकरणाची बीड जिल्ह्यासह राज्यातही मोठी चर्चा झाली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषारोपपत्र दाखवले नाही, घुले कुटुंबाचा आरोप मृत विलास यांचे भाऊ रमेश घुले यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सौरभचे ५६ फोन आल्याचा त्यांचा दावा असून, न्यायालयात दाखल करण्यापूर्वी सीआयडीने आम्हाला दोषारोपपत्र दाखवले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. सोनवणेंच्या अटकेसाठी आणि न्यायासाठी घुले कुटुंबाने अनेक आंदोलने केली होती.
Source link
घुले हत्या; सीआयडीचे 10 जणांवर आरोपपत्र:खासदारपुत्राचे नाव नाही, केज कोर्टात 400 पानी आरोपपत्र; घुले कुटुंबाची नाराजी