![]()
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे, या आरोपांखाली दाखल करण्यात आलेल्या खटल्यात राहुल सदाशिव कराड, सदाशिव सोपान कराड आणि शारदा सदाशिव कराड या तिघांची पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अभियोग पक्षाला आरोप ठोस पुराव्यांनिशी सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. मृत ज्ञानेश्वरी हिच्याकडे टेम्पो घेण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप सरकार पक्षाने केला होता. या प्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 304-ब, 498-अ, 506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात आला. मात्र, साक्षीदारांच्या उलट तपासणीत अभियोग पक्षाच्या दाव्याला छेद देणाऱ्या बाबी समोर आल्या. कथित हुंड्याची मागणी, छळ, यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारी तसेच आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कथनाबाबत ठोस पुरावे आढळले नाहीत. मृताची बहीण असलेल्या साक्षीदाराच्या उलट तपासणीतही एक लाख रुपयांची मागणी आणि छळाचा आरोप ठोसपणे सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले. तपास अधिकाऱ्यांचा पुरावाही आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अभियोग पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा निकाल दिला. आरोपींच्या वतीने ॲड. निलेश वाघमोडे आणि ॲड. गणपत कराड यांनी काम पाहिले.
Source link
ज्ञानेश्वरी कराड मृत्यू प्रकरण:पुराव्यांअभावी सासरच्या तिघांची निर्दोष मुक्तता, पुणे न्यायालय निकाल