Headlines

जिल्ह्यात 50 दिवसांनंतर पाऊस, वेळापुरात दमदार एंट्री‎:पंढरपूर, माळशिरस, माढा, अक्कलकोट, करमाळ्यात पाऊस, खरीप वाया गेल्यानंतर आलेल्या पावसामुळे पुन्हा रब्बीच्या आशा पल्र्लवित‎


.

दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी वेळापूरमध्ये अर्धा तासच धुवांधार बरसात झाली. मागील दोन महिन्यांपासून एक थेंबही न पडलेल्या भागात रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे वेळापूरमधील ग्रीन सिटी परिसरात तळ्याचे स्वरूप आले होते.

पावसाअभावी खरीप पिके जळून गेल्यानंतर आता पावसाने हजेरी लावली. मात्र खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ग्रीन सिटी परिसरात पाणीच पाणी झाले होते. इंदापूर-सांगोला रस्त्यावरून थोडे-फार पाणी वाहात असल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. तालुक्यातील जवळपास सुमारे १५ गावात सोमवारी या पावसाचे सुमारे दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आगमन झाले. माळशिरस तालुक्यात गेली सुमारे दोन महिने पावसाने पूर्ण दडी मारल्यामुळे तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. सुमारे ३८ अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानाने दिवसभर प्रचंड अस्वस्थता पसरली होती. हवामान खात्याच्या वेगवेगळ्या अंदाजानुसार लोक मोठ्या अपेक्षेने विश्वास ठेवून आशेवर जगत होते. मात्र सोमवारी दिवसभराच्या तापमानानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. वेळापूर, निमगाव, तांदुळवाडी, खंडाळी, शंकरनगर, उघडेवाडी, गिरझणी, नातेपुते, तांबेवाडी, बोंडले, वाघोली आदी गावात सुमारे अर्धा तास चांगला पाऊस झाला.

मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप वाया गेले. हातचे पीक वाया गेल्यानंतर पावसाने हजेरी लावली. मागील वर्षी दमदार पाऊस झाला. भीमा, सीना नद्यांना पूरही आला होता. मात्र यंदा पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

पांडे | करमाळा शहरासह परिसरातील वडगाव, पूनवर, मांगी, पोथरे, खडकी, पांडे, गुळसडी, रोशेवाडी, हिवरवाडी भोसे या गावातही तब्बल ५२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. करमाळा शहरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाने करमाळा शहरासह परिसरातील ग्रामीण भागात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे करमाळा शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्यावर असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

अक्कलकोट स्टेशन | अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी येथे वीज कोसळून नामदेव उमाजी राठोड (वय ४८) हे ठार झाले. तर इस्माईल शौकत मुल्ला हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सोलापूर येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेची दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान आज सोमवारी (दि. २१) सायंकाळी ४.३० वाजता ही घटना घडली. यावेळेस साधारण एक तास मुसळधार पाऊस पडत होता. त्यावेळी गावाच्या पाठीमागील बाजूस चिंचेच्या झाडाखाली काही तरुण उभे होते. अचानक वीज कोसळल्यामुळे दोघे खाली कोसळले. असता त्यांना खासगी गाडी करून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्य झाल्याचे घोषित केले.

मोहोळ | तालुक्यासह जिल्ह्यात मागील दीड-दोन महिने पाऊस नव्हता. पिके करपून गेली आहेत. प्रतीक्षेनंतर सोमवारी पहाटे झालेल्या तालुक्यातील नऊ मंडलापैकी सात मंडलामध्ये १५.४२ एमएम पाऊस पडला. तर दोन मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली नाही. सोमवारी तालुक्यातील ९ मंडलापैकी मोहोळ, वाघोली, नरखेड, शेटफळ, टाकळी (सिं), पेनूर, अनगर या सात मंडलात एकूण सरासरी पाऊस १५.४२ मिमी पाऊस झाला. तर सावळेश्वर व कामती मंडळात पाऊस झाला नाही. बहुतांश शेती पिकांना पाणीपुरवठा करण्यासह शहरातील घरांमध्ये स्वतःचे खासगी बोअर असल्याने सार्वजनिक जलस्त्रोतांवर झालेल्या पावसाचा फारसा फरक पडणार नाही. सद्यस्थितीला जलस्त्रोतही शेवटच्या घटका मोजत आहेत.

कुर्डुवाडी | दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कुर्डुवाडी शहर आणि परिसरात उत्तरा नक्षत्राच्या मुहूर्तावर परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. ​यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे, ज्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. मात्र, उत्तरा नक्षत्राच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या पावसाने रब्बी हंगामासाठी आशेचा किरण दाखवला आहे. रब्बी हंगामात तरी समाधानकारक पाऊस होऊन पिके हाती येतील, अशी आशा आता सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. ​दुसरीकडे, पावसाअभावी शेतकरी आणि पशुपालकांपुढे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनून आवासून उभा ठाकला होता. बाजारपेठही मंदावली होती. आज झालेल्या या मुसळधार पावसामुळे रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आज परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगाम चांगला होण्याच्या आशेने व्यापारी आणि व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पावसाची तीन नक्षत्रे हस्त, चित्रा आणि स्वाती ही अजून बाकी आहेत. या काळात पावसाने निसर्गाने साथ दिल्यास येणारा रब्बी हंगाम समाधानकारक ठरेल आणि शेतकरी संकटातून बाहेर पडेल, अशी आशा सर्वसामान्य शेतकऱ्यांमडून व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर शहर व परिसरात सोमवारी (दि. २१) सायंकाळी पाच वाजल्यानंतर सुमारे अर्धा तास मध्यम ते जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. साचलेल्या पाण्यातून नागरिक व वाहनचालकांना मार्ग काढावा लागला. सुमारे एक महिन्यानंतर शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून लहान मुले चालताना दिसत होती, तर काही ठिकाणी दुचाकी व इतर वाहने पाण्यातून मार्गस्थ होताना दिसली. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली. नवी पेठ भागातील रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला पावसात वाहून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात प्राणी साचले होते. शेतकऱ्यांना पाऊस नसल्याने शेती सांभाळणेही अडचणीचे ठरत आहे. रमेश जाधव, संचालक, माळशिरस विज्ञान केंद्र

पंढरपूर तालुक्यातील आंबे, चळे, मुंढेवाडी, रांजणी, गोपाळपूर आदी ग्रामीण भागांतही पावसाने हजेरी लावली. तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून बळीराजा सुखावला आहे. आणखी तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यात पाऊस मंगळवारीही संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहील. बुधवार आणि गुरुवारीही जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस असेल. शुक्रवारनंतर मात्र पाऊस बंद होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *