Headlines

पुणे फेस्टिव्हल अधिक व्यापक व्हावा:काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी 38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये 'मराठी बाणा'चे केले उद्घाटन




पुणे फेस्टिव्हल केवळ एक सांस्कृतिक महोत्सव नसून, त्यामागे दिवंगत नेते सुरेश कलमाडी यांची दूरदृष्टी आहे. हा महोत्सव आगामी काळात अधिक व्यापक आणि शाश्वत स्वरूपात सुरू राहिला पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. गणेश कला-क्रीडा रंगमंदिर येथे निर्माते, लेखक व दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा ७० एमएम’ या कार्यक्रमाचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पुणे फेस्टिव्हलचे दिवंगत संस्थापक सुरेश कलमाडी यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, कॉंग्रेस शहराध्यक्ष (पूर्व विभाग) प्रशांत जगताप, अशोक हांडे, नगरसेवक सुनील शिंदे, बाळासाहेब अमराळे, निरुद्दीन सोमजी, सुनील मलके, सौरभ अमराळे आणि सचिन आडेकर उपस्थित होते. सपकाळ म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून वृत्तपत्रांमधून पुणे फेस्टिव्हलबाबत वाचत होतो. पण, आज प्रत्यक्ष महोत्सवाला भेट दिल्यानंतर त्याची व्याप्ती आणि महत्त्व समजले. यातून सुरेश कलमाडी यांची दूरदृष्टी दिसून येते. नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले असले, तरी पुणे फेस्टिव्हलमुळे त्यांची ओळख आजही कायम आहे.” पुणे फेस्टिव्हल हा सर्वसमावेशक सांस्कृतिक उपक्रम असल्याचे सांगत सपकाळ यांनी सामाजिक सलोख्याचा मुद्दाही मांडला. समाजात जाती-धर्मांमधील भेदभावाची दरी वाढत असताना, संस्कृतीच्या नावाखाली एकाच विचाराची व्याख्या पुढे केली जात आहे, असे ते म्हणाले. साने गुरुजींच्या विचारांचा संदर्भ देत, “स्वतःच्या ताटातील अन्न सर्वांनी वाटून खाणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे,” असेही त्यांनी नमूद केले. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी माहिती दिली की, यंदा ‘अंधमुक्त पुणे’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यातून नेत्रदानाबाबत जनजागृती केली जात आहे. यंदा विविध विषयांवरील एकूण ५३ विनामूल्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुणे फेस्टिव्हल हा पुणेकरांचा महोत्सव असल्याचे सांगत, पुढील वर्षी कोणता नवीन कार्यक्रम पाहायला आवडेल, याबाबत नागरिकांनी सूचना कराव्यात, असे आवाहनही गोयल यांनी केले.दरम्यान, अशोक हांडे दिग्दर्शित ‘मराठी बाणा-70 एमएम’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोकपरंपरा, संतपरंपरा, सण-उत्सव आणि लोककलांचे विविध पैलू गीत आणि नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले. रसिकांच्या चांगल्या प्रतिसादात हा कार्यक्रम यशस्वी झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *