![]()
पुणे शहरात 150 गणेश मंडळांना यंदाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. कोरोनानंतर स्थापन झालेल्या आणि मागील दोन-तीन वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात सहभागी होणाऱ्या मंडळांना ही विशेष संधी देण्यात आली आहे. मात्र, या परवानगीचा पुढील वर्षांसाठी हक्क समजू नये, असे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंडळांच्या प्रतिनिधींना दिले आहेत. मागील दोन वर्षांत चतु:शृंगी, शिवाजीनगर, गोखलेनगर यांसारख्या भागांतील काही मंडळांना कुमठेकर रस्त्याने मिरवणुकीत सहभागी होण्याची तात्पुरती परवानगी मिळाली होती. ही परवानगी फक्त त्या वर्षासाठीच होती. यंदा सुरुवातीला या मंडळांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर मंडळांच्या प्रतिनिधींनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर विशेष बाब म्हणून यंदापुरती केळकर किंवा कुमठेकर रस्त्याने मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. मिरवणुकीत सहभागी होताना मंडळांनी पोलिसांनी घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. ‘यंदा परवानगी मिळाली म्हणजे पुढील वर्षीही मिळेल’, असे गृहीत धरू नका, असेही त्यांनी मंडळांच्या प्रतिनिधींना बजावले. यंदा 75, 100, 125 किंवा 150 वर्षे पूर्ण करणाऱ्या मंडळांना मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. ही मंडळे या नियमाला अपवाद आहेत. मात्र, मागील वर्षी परवानगी मिळालेल्या किंवा यंदा परवानगी मागितलेल्या इतर कोणत्याही मंडळाला परवानगी दिली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पारंपरिक पासअंतर्गत कायमस्वरूपी परवानगी असलेली अनेक मंडळे आहेत. यात लक्ष्मी रस्त्यावरील 266, टिळक रस्त्यावरील 237, कुमठेकर रस्त्यावरील 79 आणि केळकर रस्त्यावरील 22 मंडळांचा समावेश आहे. मात्र, या सर्व मंडळांचा प्रत्यक्ष सहभाग संबंधित मार्गावर होतोच असे नाही. लक्ष्मी रस्त्यावर यंदा सुमारे 160 ते 166 मंडळे सहभागी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 117 मंडळांनी प्रथमच मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. यंदा आणखी 23 मंडळांनी प्रथमच अर्ज केले आहेत. या नव्या अर्जदारांना मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
Source link
150 गणेश मंडळांना मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी:मागील वर्षी तात्पुरती संधी मिळालेल्यांना यंदाही मुभा; पण पुढील वर्षी हक्क नाही