![]()
नारेगाव आणि चिकलठाणा परिसरात विनापरवानगी चक्क काँक्रीटचे रस्ते बनवून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या भूमाफियांना महापालिकेने गुरुवारी (२४ सप्टेंबर) जोरदार दणका दिला. अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या पथकाने एकाच दिवसात तब्बल २३.५ एकर जागेवरील ७३५ अनधिकृत प्लॉटची मार्किंग आणि रस्ते बुलडोझरच्या साहाय्याने उखडून टाकले. विशेष म्हणजे, प्लॉटिंगवर कारवाई होऊ नये म्हणून महापालिकेतील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले; पण मनपाच्या पथकाने त्यांना न जुमानता कारवाई केली. प्रशासनाची परवानगी नसताना भूमाफियांची मजल थेट सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यापर्यंत गेलीच कशी, हा मोठा प्रश्न आहे. मनपाच्या माहितीनुसार, नारेगाव येथील गट क्रमांक २४ मध्ये खटोड यांच्या मालकीच्या ८.५ एकर जागेवर २४५ प्लॉटची बेकायदा आखणी केली होती. दुसरी मोठी कारवाई चिकलठाणा येथील गट क्रमांक ३६५ मध्ये केली. येथील १५ एकरांवर ४९० अनधिकृत प्लॉट पाडले होते. या जमिनीचे मूळ मालक दिगंबर दहिहंडे असून प्लॉट विक्रीचे काम जाफर काझी व मोहम्मद आरिफ करत होते. मनपाने या लेआउटवरील रस्ते आणि खुणा तर उद्ध्वस्त केल्या आहेत, प्लॉटिंगला राजकीय वरदहस्त मनपाने कारवाई केलेली प्लॉटिंग राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीची होती. त्यामुळे मनपाच्या सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपाच्या पथकाने हा दबाव झुगारून कारवाई पूर्ण केली. या ठिकाणी बांधकाम झालेले असून गुंठेवारी करून घेतल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. एजंटांवरही गुन्हे दाखल करणार शहरामध्ये विक्री होत असलेल्या अनधिकृत प्लॉटिंगधारकांसह जे एजंट अशा प्रकारच्या जाहिराती करतील किंवा खरेदी विक्री करतील त्यांच्यावरदेखील आता गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यासोबतच कारवाई करण्यात आलेले अनधिकृत गटदेखील ब्लॉक करण्यात आले आहेत. – संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग खरेदीदारांनो, स्वस्तात मिळणाऱ्या प्लॉटच्या आमिषाला बळी पडू नका अनेकदा सर्वसामान्य नागरिक किंवा नोकरदार वर्ग कमी पैशांत भूखंड मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडतात. माफिया त्यांना आकर्षित करण्यासाठी ले-आऊटमध्ये असेच सिमेंटचे रस्ते आणि मार्किंग करून दाखवतात. मात्र, अशा अनधिकृत जागांवर पैसे गुंतवल्यास ते पूर्णपणे बुडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही भूखंड खरेदीपूर्वी जमिनीची कागदपत्रे, आवश्यक परवानग्या आणि लेआऊटची वैधता तपासावी. शहरात नव्याने अनधिकृत प्लॉटिंग होऊ नये, यासाठी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
Source link
अवैध प्लॉटिंगवर बडगा:सत्ताधाऱ्यांचा दबाव झुगारून चिकलठाणा, नारेगावात 735 प्लाॅटचे लेआउट उद्ध्वस्त