![]()
गेल्या ४६ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मका, सोयाबीन, बाजरीसह विविध खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती शासनदरबारी मांडण्यासाठी पंचनामे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठवावा, असे निर्देश माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार माजी खासदार समीर भुजबळ यांनी ममदापूर व राजापूर परिसरातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त मका, सोयाबीन, बाजरी यांसह विविध खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दीर्घकालीन पावसाअभावी पिकांची वाढ पूर्णतः खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे झालेल्या अतोनात नुकसानीची माहिती माजी खासदार भुजबळ यांना दिली. तसेच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न आणि आगामी रब्बी हंगामासाठी निर्माण होणाऱ्या गंभीर अडचणींबाबतही शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. “दुष्काळग्रस्त भागातील एकही शेतकरी किंवा शेत पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. दोन दिवसांत सर्व भागांतील सरसकट नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे तातडीने सादर करावा, असे निर्देश माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रशासनाने पूर्व भागातील गरजू गावांमध्ये आठवडाभरात पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबतचे नियोजन पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, मच्छिंद्र थोरात, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नितीन गायकवाड, दीपक गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
येवल्यात 46 दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपली:सरसकट पंचनामे करून अहवाल सादर करा- माजी खासदार भुजबळ