.

भिंगार विसर्जन मिरवणुकीत बुधवारी रात्री दीपक रामकिसन वाघस्कर (वय ५०, रा. भिंगार) यांच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या लाठीमारामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. वरिष्ठ अधिकारी आणि आ. जगताप यांच्यात चर्चा होऊन चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सुमारे १८ तासांनंतर उर्वरित गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांवर लाठीमाराचा आरोप केला. मात्र, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आरोप फेटाळून लावला होता. वाघस्कर यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशीसाठी शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी करत भिंगारसह अहिल्यानगर शहरात उद्या होणारी विसर्जन मिरवणुकही काढली जाणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. सायंकाळी अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डीचे उपअधीक्षक अमोल भारती यांनी आ. जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यात चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
^ पोलिस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. भिंगार उपनगराला अहिल्यानगर शहरापेक्षाही मोठा इतिहास आहे. मात्र काल सायंकाळी अंधार पडू लागल्यापासून पोलिसांनी विनाकारण मारहाण सुरू केल्याची तक्रार युवकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकाराची बाहेरील अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी व्हावी आणि स्थानिक पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली होती. त्यानुसार प्रशासनाने संबंधित पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी. संग्राम जगताप, आमदार.
आंदोलनाच्या दबावामुळे पोलिस प्रशासनाचा यू टर्न दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या लाठीमारामुळे ही घटना घडल्याचे आरोप झाले. यावरून तणाव निर्माण होत असतानाही पोलिस अधीक्षकांनी ठोस भूमिका घेत हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होऊन अहिल्यानगर शहरातील विसर्जन मिरवणूक न काढण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला घेतलेली आक्रमक भूमिका सोडून पोलिस प्रशासनाने यु टर्न घेत काहीशी मवाळ भूमिका घेतली. आमदार जगताप व आंदोलकांशी चर्चा करत चौकशीची तयारी दर्शवली.