![]()
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव व परिसरात सध्या दुष्काळाचे संकट घोंगावत असून परिस्थिती बिकट बनली आहे. पावसाअभावी खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली असून आता पशुधन वाचवायचे कसे, या चिंतेने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि परिसरातील सिंचनक्षेत्र वाढवण्यासाठी मार्कंडी नदीवर उभारण्यात आलेला सिरेगाव-शिल्लेगाव मध्यम प्रकल्प स्वतःच प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरला आहे. १९९५ मध्ये पूर्ण झालेला हा प्रकल्प गेल्या २९ वर्षांत एकदाही १०० टक्के क्षमतेने भरलेला नाही. सध्या या धरणात केवळ ५ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे. शिल्लेगाव व लासूर स्टेशन परिसरातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली यावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उदात्त हेतूने या मध्यम प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. यासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, चुकीचे नियोजन आणि भौगोलिक परिस्थितीचा योग्य अभ्यास न केल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला असून जमिनी गमावलेले शेतकरी मात्र भूमिहीन झाले आहेत. प्रकल्पाच्या निर्मितीपासून पहिले सहा वर्षे यात जेमतेम १० टक्केच पाणी होते. २००२ मध्ये हा प्रकल्प ६० टक्के, तर २००९ आणि २०२३-२०२४ मध्ये सर्वोच्च ७० टक्क्यांपर्यंत भरला होता. २०२५ च्या दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला होता, पण आजतागायत हे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकलेले नाही. या प्रकल्पाच्या अपयशामागे प्रशासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरले आहे. सुलीभंजन डोंगरातून उगम पावणाऱ्या मार्कंडी नदीवर अवघ्या ३ ते ४ किलोमीटर अंतरावर वेरुळ फाटा येथे एक छोटे धरण बांधण्यात आले. त्यापुढील ७ ते ८ किलोमीटरवर डोणगाव-धामोरी दरम्यान पुन्हा मध्यम प्रकल्प उभारला गेला. २० किलोमीटरच्या मर्यादित अंतरात ३ धरणे झाल्यामुळे शिल्लेगाव प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र अत्यंत कमी झाले असून धरणात पाण्याची आवकच होत नाही.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अभ्यासक डॉ. अजय पवार आणि गणेश तूपशेंद्रे यांनी केली आहे. टँकर आणि चारा छावण्यांची मागणी या वर्षी पावसाळ्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे कपाशी, तूर, आले, मका, टोमॅटो आणि भाजीपाल्याची पिके वाळून गेली आहेत. नेहमी कर्जाच्या खाईत ढकलला जाणारा शेतकरी आता पूर्णपणे खचला आहे. यामुळे शासनाने कडक निकष बाजूला ठेवून तत्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत आणि पशुधनासाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात, अशी तीव्र मागणी जोर धरू लागली आहे.
Source link
शिल्लेगाव प्रकल्पामध्ये केवळ 5% जलसाठा; पाणीटंचाईचे संकट गडद, खरीप पिके वाया गेली, आता पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ