![]()
पावसाचा खंड आणि उन्हाच्या तडाख्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा गंभीर पाणीसंकट ओढवले आहे. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे विभागातील नगर परिषदांच्या क्षेत्रात पाण्याच्या नियोजनावर विपरीत परिणाम होत आहे.
.
छत्रपती संभाजीनगर विभागातील बहुतांश शहरांमध्ये ३ ते १० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसा पाऊस न पडल्यास आगामी काळात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काही तालुक्यांत वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नागरिकांना १०-१० दिवस पाण्यासाठी ताटकळावे लागत आहे. मराठवाड्यातील लघु प्रकल्पांत केवळ १६.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ५४.५२ टक्के होते. मध्यम प्रकल्पांत केवळ २३.७० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ७२.७४ टक्के होते.
कमी पाणीसाठा अडचणीचा ठरणार
मराठवाड्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांतील पाणीसाठा २० टक्क्यांवर आला आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांमधून ग्रामीण भागात सिंचनासह नगरपालिका क्षेत्रांत पाणी पुरवले जाते. या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या नगरपालिकांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे.
शहरांमधील पाणीपुरवठ्याची विभागात कोठे काय स्थिती?
विभागीय आयुक्तालयातील नगर परिषद प्रशासनाच्या अहवालानुसार शहरांची स्थिती बिकट आहे. सर्वात वाईट स्थिती (८ ते १० दिवसांआड) : बीड शहर (१० दिवस), जालना जिल्ह्यातील जाफराबाद (१० दिवस) व बदनापूर (९ दिवस), औसा (८ दिवस), आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार (प्रत्येकी ८ दिवस). मध्यम संकट (५ ते ७ दिवसांआड) : लातूर जिल्ह्यातील देवणी व जळकोट (७ दिवस), रेणापूर, हिंगोली (६ दिवस), शिरूर अनंतपाळ (५ दिवस); बीडमधील अंबाजोगाई व केज (अनुक्रमे ८ व ५ दिवस) कमी संकट (१ ते ४ दिवसांआड) : सेलू, उदगीर, अहमदपूर, औंढा नागनाथ, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, सिल्लोड, कन्नड (३ ते ४ दिवसांआड), निलंगा, सेनगाव, घनसावंगी (१ ते २ दिवसांआड)
पाण्याचे नियोजन अपेक्षित
जलतज्ज्ञ जयसिंह हिरे यांनी सांगितले की, ‘मराठवाड्यात या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आणि मोठा खंड पडल्यामुळे परिस्थिती अवघड झाली आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे शासन पातळीवर आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागेल, अन्यथा सर्वाधिक फटका शेतीला बसेल.’