![]()
गणरायाला निरोप देतानाही भक्ती, शिस्त आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पैठण पोलिस ठाण्याच्या वतीने यंदाची विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. टाळ-मृदंगाचा निनाद, संत एकनाथ महाराज आणि संत भानुदास महाराजांच्या अभंगांनी भारावलेले
.
पोलिस ठाण्यात मोठ्या श्रद्धेने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाचे विसर्जन शुक्रवारी होणाऱ्या शहरातील मुख्य व सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या एक दिवस आधी गुरुवारी करण्यात आले. शुक्रवारी शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे सज्ज राहता यावे, या नियोजनातून हा निर्णय घेण्यात आला. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मिरवणुकीत पोलीस अधिकारी, पुरुष कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चंद्रकांत पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हातात टाळ-मृदंग घेऊन संतांचे मधुर अभंग सादर केले. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात कर्मचाऱ्यांनी फुगड्या खेळत गणरायाला नमन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी बस स्थानक मार्गाने निघालेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
सामान्यतः गणेश विसर्जनादरम्यान गुलालाची उधळण आणि डीजेचा कर्णकर्कश आवाज पाहायला मिळतो. मात्र पैठण पोलिसांनी त्याला पूर्णपणे फाटा देत एक नवा पायंडा पाडला. मिरवणुकीच्या मार्गावर व गणरायाच्या मूर्तीवर केवळ फुलांची वर्षाव करण्यात आला. त्यामुळे वातावरणात रंगांऐवजी फुलांचा सुगंध पसरला होता.
पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध उत्सवाचा आदर्श मिळेल आज शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक असल्याने पोलिस ठाण्यातील गणरायाचे विसर्जन गुरुवारी करण्यात आले. या मिरवणुकीतून इतर गणेश मंडळांना पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध उत्सवाचा आदर्श मिळेल, हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले.