Headlines

बाजारात टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संकटात‎:पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी




सिल्लोड तालुक्यात मिरची व टोमॅटो यांसारख्या भाजीपाला पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, यंदा सुरुवातीला पावसाने प्रदीर्घ उघडीप दिल्याने आणि वेळेवर पाणी न मिळाल्याने पिकांच्या नैसर्गिक वाढीवर व गुणवत्तेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला. या नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचवले खरे, परंतु आता बाजारपेठेत टोमॅटोचे दर कमालीचे घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्य बाजारपेठांमध्ये टोमॅटोची आवक प्रचंड वाढल्याने दरावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. टोमॅटो हे अत्यंत नाशवंत पीक असल्याने ते जास्त काळ साठवून किंवा रोखून ठेवता येत नाही. त्यामुळे बाजारभाव अत्यंत कमी असतानाही नाईलाजाने शेतकऱ्यांना आपला सर्व माल विक्रीसाठी बाजारात आणावा लागत आहे. टोमॅटोचे दर्जदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच मोठा आर्थिक भार उचलावा लागतो. एका एकराचा विचार केला तर जमिनीच्या मशागतीसाठी १० ते १२ हजार रुपये, मल्चिंग पेपरसाठी १२ ते १४ हजार रुपये, ठिबक सिंचनासाठी ८ ते १० हजार रुपये आणि उत्कृष्ट रोपांसाठी ८ ते १० हजार रुपयांचा खर्च येतो. याशिवाय पिकाचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणीवर ३० ते ३५ हजार रुपये, विविध खतांवर ३० ते ३५ हजार रुपये, झाडांना आधार देण्यासाठी बांबूवर २० ते २५ हजार रुपये, तार व सुतळीवर १६ ते २० हजार रुपये आणि लागवडीपासून काढणीपर्यंत मजुरीवर ३० ते ४० हजार रुपये असा लाखो रुपयांचा भांडवली खर्च होतो. टोमॅटो पिकवण्यासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतुकीवर मोठा खर्च झाला आहे. मात्र बाजारात टोमॅटोचे दर इतके घसरले आहेत की केलेला उत्पादन खर्चही भरून निघत नाही. रात्रंदिवस रान एक करून पिकवलेला शेतमाल अत्यंत तुटपुंज्या दराने विकावा लागत असल्याने आमचे अतोनात आर्थिक नुकसान होत असल्याची खंत टोमॅटो उत्पादक शेतकरी संतोष डफळ यांनी व्यक्त केली. पिंपळदरीत टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. टोमॅटोचे पीक उपटून टाकण्याचा विचार ः शेतकरी मोठा खर्च करूनही टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यातच वाहतूक भाडे आणि हमालीचा खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात नगण्य रक्कम उरत आहे. यामुळे पिकासाठी झालेला मूळ खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे. काही शेतकरी टोमॅटोचे पीक उपटून टाकण्याचा किंवा शेतातच सोडून देण्याचा गंभीर विचार करत आहेत. बाजारातील दराची घसरण या दुहेरी मारामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *