![]()
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी थेट मेट्रोने प्रवास करत नागरिकांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी पुणेकरांना रात्री १२ च्या आत शिस्तबद्ध विसर्जन करण्याचे आवाहन केले. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, सध्याची स्थिती अतिशय ‘भयानक’ असल्याचे म्हटले आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात असल्याने त्यांनी बाप्पाकडे पावसासाठी साकडे घातले आहे. ‘१२ च्या आत डॉल्बीमुक्त विसर्जन करा’ विसर्जन मिरवणुकीतील आपल्या सहभागाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१९ मध्ये कोथरूडमधून निवडणूक लढवल्यापासून ते सातत्याने या मिरवणुकीच्या सुरुवातीला सहभागी होत आहेत. “मिरवणुकीत सहभागी होणे आणि लोकांना भेटणे हा आनंदाचा विषय असतो. मात्र, हायकोर्टाच्या कडक सूचनांमुळे यंदा डॉल्बी, लेझर आणि प्लाझ्माचा प्रभाव मिरवणुकीवर राहणार नाही. आपण शास्त्र मानतो आणि शास्त्रानुसार रात्री १२ वाजता दिवस बदलतो. त्यामुळे लोकांनी जास्त वेळ न लावता, सर्वांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने रात्री १२ च्या आत विसर्जन पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा,” असे आवाहन त्यांनी केले. वनाझवरून थेट मेट्रोने प्रवास विसर्जनाच्या दिवशी शहरातील ट्रॅफिक आणि गर्दी लक्षात घेता, चंद्रकांत पाटील यांनी वनाझवरून मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. तत्पूर्वी त्यांनी सकाळी अभिनेते नाना पाटेकर यांच्या रिसॉर्टवर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. “प्रवासात अनेक लोकांशी गप्पा झाल्या. आज जवळपास ५ लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केल्याचा अंदाज आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता, आता पुणेकरांना मेट्रोची सवय लावून घ्यावीच लागेल, तरच आपण ट्रॅफिक कोंडीतून सुटू शकू,” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘दुष्काळाची स्थिती भयानक’ पुण्यात विसर्जनाचा मोठा उत्साह असला तरी ग्रामीण भागात पावसाअभावी शेतकरी हवालदिल आहे, यावर विचारले असता त्यांनी अत्यंत गंभीर प्रतिक्रिया दिली. “ती अतिशय भयानक परिस्थिती आहे. भयानक हाच शब्द वापरावा लागेल अशी स्थिती गावांमध्ये निर्माण झाली आहे. खरीप पीक जवळपास गेलेच आहे आणि परतीचा पाऊस नसल्याने रब्बीवरही मोठा परिणाम होईल. शेतीचे नुकसान भरून काढता येईल, पण पाण्याचे काय? सप्टेंबर महिना संपायच्या आतच गावांमध्ये टँकर सुरू झाले आहेत आणि आपल्याला अजून नऊ महिने काढायचे आहेत. या ११ दिवसांत मी जवळपास ३०० सार्वजनिक आणि घरगुती गणपतींना भेट दिली आणि सर्वत्र हीच प्रार्थना केली की किमान ७-८ दिवस चांगला पाऊस पडावा, जेणेकरून खरीप वाचेल, रब्बी चांगली येईल आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल,” अशी उद्विग्नता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. हेही वाचा.. पुढच्या वर्षी लवकर या!: राज्यभरात अनंत चतुर्दशीचा अभूतपूर्व उत्साह, मुंबई-पुण्यात ढोल-ताशांचा गजर; 5 कोटी भाविक रस्त्यावर गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या एकाच जयघोषाने राज्यातील प्रमुख शहरे आणि गावे दुमदुमून गेली आहेत. सविस्तर वाचा
Source link
निसर्गाचे विघ्न तूच दूर कर!:परिस्थिती अत्यंत भयानक, बाप्पा 7-8 दिवस तरी चांगला पाऊस पाडा – चंद्रकांत पाटलांचे विघ्नहर्त्याला साकडे