![]()
तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, तलावातील पाण्याचा शेतीसाठी वापर, बंद करण्यात आलेला शेतीपंपांचा वीजपुरवठा तसेच कर्जमाफीच्या प्रश्नावर कोळगाव फाटा येथील कांडेकर लॉन्स येथे रविवारी शेतकऱ्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विसापूर, मोहरवाडी, घोटवी, पारगाव, औटेवाडी, घोडेगाव, देऊळगाव यासह विविध तलावांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना त्याचा वापर करण्यास प्रतिबंध केला जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतीपंपांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने उभी पिके धोक्यात आली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बैठकीदरम्यान आमदार विक्रम पाचपुते यांनी दूरध्वनीद्वारे शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. सध्या आंदोलनाची भूमिका घेऊ नये. मंगळवारी महसूल मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठक होणार असून बुधवारपर्यंत वेळ द्यावा, त्यानंतर सर्वजण मिळून पुढील निर्णय घेऊ, असे पाचपुते यांनी सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक करताना माजी जि.प. सदस्य हेमंत नलगे म्हणाले, आमच्या भागातील शेतकरी तलावातील पाण्यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत पाणी आणि वीज वापरू दिली नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके हातातून जातील. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.राजेंद्र म्हस्के म्हणाले, तलावात पाणी उपलब्ध असतानाही त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी शेतीपंपांचे वीज कनेक्शन बंद केल्यामुळे पिके जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तलावातील पाणी वापरावरील बंदी तातडीने मागे घेण्याची आणि शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करणार आहोत. आमदार विक्रम पाचपुते यांच्या विनंतीचा मान ठेवून बुधवारपर्यंत प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करू. मात्र, या कालावधीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर सर्वपक्षीय लढा उभारून शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्हस्के यांनी दिला.
Source link
तलावातील पाणी वापरावरील बंदी उठवा अन् वीजपुरवठा पूर्ववत करा:कोळगाव येथील बैठकीत शेतकऱ्यांची मागणी, आंदोलनाचाही इशारा