Headlines

पंचनाम्यांचे निर्देश:खासदार भुमरे यांच्याकडून खिर्डी, मावसाळा परिसराची पाहणी, पाणीप्रश्नासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन




तालुक्यातील खिर्डी व मावसाळा परिसरात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई आणि पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे झालेले अतोनात नुकसान याची प्रत्यक्ष पाहणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी केली. खिर्डी येथील नारायण जाधव व मावसाळा येथील वरकड यांच्या शेतातील मका व सोयाबीन पिकांची पाहणी करून त्यांनी हवालदील झालेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांना धीर देताना खासदार भुमरे म्हणाले, मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी किशोर कुकलारे, विशाल खोसरे, तालुकाप्रमुख माऊली जाधव, निखिल चव्हाण, हर्षल हिवर्डे, मनोज काळे, अतुल चव्हाण, संकेत भोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पळसवाडीचे सरपंच प्रकाश मिसाळ, खिर्डी व मावसाळा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलस्रोतांची पाहणी खासदार भुमरे यांनी खिर्डी गावातील पाणीपुरवठा योजना, विहिरी आणि उपलब्ध जलस्रोतांची पाहणी केली. पाणीटंचाई केवळ तात्पुरत्या उपायांनी न सोडवता भविष्यात गावाला नियमित पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *